
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – मूल आगामी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्र. 9 मध्ये राजकीय चित्र वेगाने बदलत असून अपक्ष उमेदवार पत्रकार सतीश आकुलवार यांच्याकडे मतदारांचा कल स्पष्टपणे वळल्याचे चित्र दिसत आहे. भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी दिलेल्या उमेदवारांविषयी मतदार मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आकुलवार हे दोन्ही पक्षांसाठी अनपेक्षितपणे कणखर डोकेदुखी ठरत आहेत.
लोकसेवेची सततची धडपड मतदारांच्या पसंतीस कारणीभूत
सतीश आकुलवार हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक भान जपत लोकांच्या मदतीसाठी सातत्याने पुढे येत असल्याची ओळख प्रभागात घट्ट झाली आहे. कोरोना काळातील मदत, वॉर्डातील रुग्णांसाठी तातडीने धावून जाणे, शासकीय योजनांचे लाभ मिळवून देणे, नागरिकांच्या समस्यांवर सतत पाठपुरावा करणे—या सर्व क्षेत्रांत त्यांची सक्रियता मतदारांच्या लक्षात राहिली आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध, संपर्क साधण्याजोगी आणि नेहमी मदतीसाठी तत्पर अशी त्यांची प्रतिमा अधिक बळकट होत आहे.
दोन्ही पक्षांचे उमेदवार ‘पार्सल’, असा मतदारांचा सूर
या प्रभागात भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दिलेल्या उमेदवारांविषयी नाराजी वाढत आहे. मतदारांच्या म्हणण्यानुसार, हे उमेदवार “पार्सल” स्वरूपात पाठविल्याप्रमाणे असून प्रभागाशी त्यांचा कोणताही प्रत्यक्ष संबंध नाही.
भाजपाचे उमेदवार माजी नगरसेवक असले तरी, दोन वेळा वेगवेगळ्या प्रभागातून निवडून आल्यावरही त्यांचा त्या भागात पुन्हा संपर्क दिसला नाही, अशी नागरिकांची भावना आहे.
तर काँग्रेसचे उमेदवार हे नगरपरिषदेमधून सेवानिवृत्त कर्मचारी असून सेवेत असताना त्यांनी लोकांसाठी सहकार्य केले असल्याची आठवण नागरिकांना नसल्याचे मतदार सांगत आहेत. “नमस्कार करण्याची सुद्धा पद्धत नव्हती”, असा सूर नागरिकांतून उमटत आहे.
स्थानिक, उपलब्ध आणि लोकाभिमुख चेहरा म्हणून आकुलवार पुढे
प्रभाग क्रमांक 9 मध्ये “आपला माणूस, नेहमी उपलब्ध असलेला नेता” अशी प्रतिमा असलेल्या सतीश आकुलवार यांच्या बाजूने मतदार कौल झुकत आहे. मोठ्या पक्षांपेक्षा लोकांची प्रत्यक्ष सेवा करणाऱ्या व्यक्तीला संधी द्यावी, अशी भावना मतदारांमध्ये वाढताना दिसत आहे.
निवडणुकीचे वातावरण तापत असताना, प्रभाग 9 मधील ही थरारक लढत शहरातील राजकीय चर्चेचा मुख्य विषय ठरत आहे.















