
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा मुंबईमध्ये प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे. हा दौरा ६ जानेवारी ला होणार असून मुंबईतील विविध भागांत सलग पाच जाहीर सभा घेण्यात येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात घाटकोपरमधून होणार असून सांगता वडाळा येथे होईल.
वस्त्यांमधील मूलभूत सोयीसुविधा, आरोग्य, शिक्षण आणि मुंबईतील सामान्यांचे हक्क या विषयांवर ते आपली भूमिका मांडतील. ‘वंचित’ची सत्ता आल्यास मुंबईचा चेहरामोहरा कसा बदलेल, याचा ‘रोडमॅप’ या सभांमधून जनतेसमोर मांडला जाणार आहे.
प्रचार दौऱ्याची सुरुवात सायंकाळी ६ वाजता माता रमाबाई आंबेडकर नगर, डी. बी. पवार चौक, घाटकोपर (पूर्व) येथे होणाऱ्या जाहीर सभेने होईल. त्यानंतर सायंकाळी ६:४५ वाजता लुंबिणी बाग, गोवंडी येथे दुसरी सभा होणार आहे.
सायंकाळी ७:४५ वाजता वैशाली बुद्ध विहार, नागा बाबा नगर, आर. सी. मार्ग, वाशी नाका, चेंबूर येथे तिसरी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
त्यानंतर सायंकाळी ८:४५ वाजता मुकुंदराव आंबेडकर नगर, वाशी नाका येथे चौथी सभा पार पडणार आहे.
प्रचार दौऱ्याची सांगता रात्री ९:३० वाजता कोरबा मिठागर, वडाळा येथे होणाऱ्या पाचव्या जाहीर सभेने होणार आहे.
मुंबईच्या राजकारणात ‘वंचित’ ची ही ‘एन्ट्री’ प्रस्थापित पक्षांच्या गोटात अस्वस्थता निर्माण करणारी ठरेल, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून अॅड. प्रकाश आंबेडकर मुंबईतील मतदारांशी थेट संवाद साधणार असून वंचित बहुजन आघाडीची भूमिका, महानगरपालिका निवडणुकीसाठीचे धोरण आणि उमेदवारांचे मुद्दे मांडणार आहेत.
या जाहीर सभांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.















