prabodhini news logo
Home ठळक बातम्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजनेचा राज्यभर शुभारंभ

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजनेचा राज्यभर शुभारंभ

0
140

मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
mojissports@gmail.com
8104170564

मुंबई – 23 जानेवारी : सर्वसामान्य माणसाच्या श्रद्धेला सुरक्षितता आणि परवडणाऱ्या खर्चाची जोड देणारी एक लोकाभिमुख योजना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सुरू केली आहे. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आलेली ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे — एसटी संगे तीर्थाटन’ योजना म्हणजे श्रद्धा, सुविधा आणि सामाजिक न्याय यांचा सुरेख संगम असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष मा. ना. प्रताप सरनाईक यांनी केले.
ही योजना ‘स्वस्त आणि सुरक्षित’ या ब्रीदवाक्यावर आधारित असून, सामान्य प्रवाशांना परवडेल अशा दरात धार्मिक पर्यटनाचा लाभ मिळावा, हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. राज्य शासनाने एसटी प्रवासासाठी दिलेल्या सर्व सामाजिक सवलती या योजनेत जशाच्या तशा लागू राहणार आहेत. महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना मूळ तिकिटावर ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक एसटी आगार कार्यक्षेत्रातून ४० प्रवाशांचा गट तयार करून, त्यांच्या सामाजिक सवलतीच्या दरात सहली आयोजित केल्या जाणार आहेत. या सहलींसाठी एसटीच्या नव्या, सुरक्षित आणि आरामदायी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
२३ जानेवारी २०२६ पासून ही योजना राज्यातील २५१ एसटी आगारांत एकाच वेळी राबविण्यात येणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार प्रत्येक आगारातून किमान ५ बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार असून, त्यामुळे राज्यभरात दररोज सुमारे १,००० ते १,२५० धार्मिक व पर्यटन विशेष बसगाड्या धावणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटनाला नवे बळ मिळणार आहे.
प्रवाशांच्या मागणीनुसार अष्टविनायक दर्शन, ११ मारुती दर्शन, पंढरपूर–अक्कलकोट, तुळजापूर, कोल्हापूर–पन्हाळा–जोतिबा, गणपतीपुळे, शेगाव, शिर्डी अशा विविध श्रद्धास्थळांच्या सहली आयोजित केल्या जाणार आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वैभवाचा अनुभव घेण्याची ही भाविकांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.
‘स्वस्त आणि सुरक्षित पर्यटन’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारी ही योजना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वसामान्यांवरील प्रेमाची आणि विचारांचीच पुढची पायरी असल्याचे सांगत, या योजनेमुळे राज्यातील लाखो भाविकांना श्रद्धेचा, सुरक्षिततेचा आणि समाधानाचा प्रवास अनुभवता येईल, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here