
सार्वजनिक जागांचा नियोजनबद्ध वापर, नागरिकांसाठी सुरक्षित व सुसज्ज सुविधा उभारण्याचे निर्देश
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
mojissports@gmail.com
8104170564
मिरा-भाईंदर : शहरातील सार्वजनिक जागांचा योग्य व नियोजनबद्ध वापर करून नागरिकांना आरोग्यदायी व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मेट्रो उड्डाणपुलाखाली उभारण्यात येणाऱ्या उद्यान व ओपन जिम प्रकल्पांची मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त मा. राधाबिनोद शर्मा (भा.प्र.से.) यांनी पाहणी केली.
दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या या पाहणीदरम्यान लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिलांसह सर्व नागरिकांसाठी उपयुक्त अशा सुविधांचा आढावा घेण्यात आला. या प्रकल्पांतर्गत चालण्याचे ट्रॅक, ओपन जिम उपकरणे, हिरवळ, प्रकाश व्यवस्था, सुरक्षितता तसेच सौंदर्यीकरणावर भर देण्यात येत आहे.
आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामांची गुणवत्ता, सुरक्षितता व वेळेत पूर्णत्व याबाबत स्पष्ट निर्देश दिले. तसेच, नागरिकांना विरंगुळा, व्यायाम आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे यासाठी या जागांचा अधिक प्रभावी वापर करण्यावर भर देण्यास सांगितले.
या पाहणीवेळी शहर अभियंता, कार्यकारी अभियंते, संबंधित कंत्राटदार व अधिकारी उपस्थित होते. मेट्रो उड्डाणपुलाखालील जागा नागरिकोपयोगी व आकर्षक बनवून शहराच्या सौंदर्यात भर घालण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत















