
महापुरुषांच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांचा उत्साह; मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक किट प्रदान
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चंद्रपूर:२६ जानेवारी, भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीतर्फे महाकाली कॉलरी येथील सेमी इंग्लिश प्राथमिक शाळेत शालेय किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला पाठबळ देण्यात आले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेतील लहान मुलांनी केलेली विविध महापुरुषांची वेशभूषा. कोणी भारतमाता, तर कोणी पंडित नेहरू, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेत नटून चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या वेशभूषेमुळे संपूर्ण शालेय परिसर देशप्रेमाच्या रंगात न्हाऊन निघाला होता.
प्रमुख उपस्थिती:
या स्तुत्य उपक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी उपस्थिती दर्शवली. यामध्ये प्रामुख्याने शंकर चापले, डॉ. प्रज्ञाशील सहारे, सिद्धार्थ भैसाळे, हरेंद्र जुनारकर, सुरज चंद्रगिरवार, सम्यक चंद्रगीरवार, नकुल कांबळे, ललिता ताई दुर्गे, शोभा ताई वाघमारे आणि बबीता मेश्राम यांचा समावेश होता. या सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
आनंदाचे वातावरण:
नवे शालेय साहित्य मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. “वंचित बहुजन आघाडी नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर राहिली असून, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा छोटासा मदतीचा हात आहे,” अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. शाळेचे शिक्षक, कर्मचारी आणि पालकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आहे.















