
रत्नागिरी जिल्ह्यात नवरत्न झाले म्हणतात, त्यात तीन भारतरत्न झाले, त्यापैकी एक बाबासाहेब आंबेडकर होते. रामजीबाबांचे सेवा निवृत्तीनंतर काळी काळ वास्तव्य दापोलीत होते. बाबासाहेबांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात आंबेडवे हे आहे. रामजीबाबांनी भीमाच्या पुढील शिक्षणासाठी दापोली आणि सातारा सोडले. पुढे आंबेडकर कुटुंब मुंबईला गेले. रमाई सुद्धा वणद सोडून मुंबईला गेल्या. बाबासाहेब रमाईची भेट मुंबईने घडवून आणली. वास्तविक दापोली पासून वणद हे रमाईचे गाव तीन किलोमीटर अंतरावर होते. तेव्हा रामजीबाबांनी वणदची मुलगी करावी लागेल हा विचार केला नसेल. मी सन 2008 पर्यंत तीन वेळा वणदला गेलो, दोन वेळा आंबेडवेला गेलो. दोन्ही ठिकाण अतिशय दुर्गम होती, आता व्यवस्था झाली. रमा ही भिकुजी धुत्रे आण रुखमा धुत्रेची कन्या. मला वणदला धुत्रेची चौदा घरे दिसली, गावात कसलीच सोय नव्हती, त्यावेळी रमाईच्या बालपणी कशी परिस्थिती असेल? अशा ठिकाणी रमाईचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 साली रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वणद या गावी झाला. रमाईंचा जन्म अत्यंत गरिबीत झाला. बालवयातच आई वडिलांचे छत्र हरपल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना जीवनातील कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला. लहानपणी आई वडिलांच्या निधनानंतर रमाईचे काका व मामा दोघेही मुंबईवरून वणद येथे आले, रमाई व तिच्या दोन्ही भावंडांना ते मुंबईला घेवून गेले. ते सर्व काकाकडे व मामांकडे राहात असत. 1908 साली सुभेदार रामजीबाबांनी भीमाचा रमाबाईंशी विवाह लावून दिला. रामजीबाबांनी रमाईची निवड केली, भीमासाठी मुलगी कशी असावी, हे रामजी बाबांना समजत होते. त्यावेळी भीमाच्या दोन सोयरिका त्यांनी तोडल्या होत्या, त्याबद्दल दंड भरावा लागला. रमाई व भीमराव यांचा विवाह भायखळ्याच्या मार्केटमध्ये झाला. लग्नाच्या वेळी रमाबाईंचे वय 9 वर्षांचे तर भीमराव 16 वर्षांचे होते. रमाईंचा स्वभाव मितभाषी, दृढनिश्चयी व अत्यंत स्वाभिमानी होता. त्या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या. उपवास व्रत-वैकल्ये त्या अत्यंत कसोशीने करीत असत. बाबासाहेबांच्या घरचे वातावरण धार्मिक होते. बुद्ध, कबिरांचे दोहे, तसेच महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचा परिणाम बाबासाहेबांवर झाला होता, तसे बाबासाहेबांनी बुद्ध, कबिर ज्योतीबांना गुरु मानले होते. तसेच त्यांचे तीन विद्या, शील, आणि स्वाभिमान हे आराध्य दैवत होते. रमाईच्या घरचे वातावरण सुद्धा धार्मिक होते. त्याच्याच परिणाम पती परदेशी शिक्षण घेत असतांना त्यांनी अत्यंत हाल अपेष्टात दिवस काढून संसार चालविला. कधीही तक्रार केली नाही. आपल्या पतीची विधवा भावजय लक्ष्मीबाई व तिचा मुलगा मुकुंद यांना तिने कधीही अंतर दिले नाही. संसाराचा गाडा चालविण्यासाठी त्यांनी शेण गोवऱ्या व सरपण वेचून अत्यंत काबाडकष्टात व काटकसरीने दिवस काढले, परंतु आपल्या पतीच्या शिक्षणात व्यत्यय येईल अशी कोणतीही कृती तिने केली नाही. त्यांना चार मुले व एक मुलगी अशी अपत्ये झाली. परंतु चार मुले लहानपणीच मरण पावली. फक्त यशवंत हा एकच मुलगा जगला, त्याचीही प्रकृती चांगली राहत नसे, म्हणून त्या नेहमी चिंता व काळजी करीत असत.
दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई. रमाईने अनेक मरणे पाहिली त्याच वेळी रमाईने आपल्या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली, खरचं संस्कार माणसाला मोठे करते. बाबासाहेब किती योग्य म्हणाले होते, रमाईने सहन केलेल्या हालअपेष्टा, पचवलेली दु:ख यातूनच ती अवघ्या समाजाची माता झाली.
त्यागमूर्ती माता रमाईने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात अमेरिका, ग्रेट ब्रिटन येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी वेळ दिला. यावेळी गरीबी आणि दुःखाचा डोंगर डोक्यावर असून देखील रमाईने बाबासाहेबाकडे कोणतीच तक्रार केली नाही. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे औषधपाण्या अभावी रमाईला स्वतःच्या पोटची चार मुले गमवावी लागली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे निश्चयाने हिमालयाच्या सावली प्रमाणे रमाई उभी राहिली, कोणत्याही प्रसंगाला धैर्याने तोंड दिले, संसारातील दुःखाचे चटके एकटिने सहन केले, रमाबाई डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सतत म्हणत असे “तुम्ही शिक्षण घेत रहा तुम्ही तुमचे ध्येय साकार करा संसाराकडे लक्ष देऊ नका, सर्व दुःखे माझ्यावर सोपवा” रमाबाईने सर्व दुःखे झेलली, रमाबाईंचे कष्ट आणि त्याग यामुळे बाबासाहेबांना आपले ध्येय पुर्ण करता आले. रमाबाई लिहायला व वाचायला शिकल्या होत्या. त्याकाळी बाबासाहेब विदेशात असतांना दोघांचा पत्रव्यवहार होत होता. डॉ.बाबासाहेबांना ज्ञानाची भूक इतकी प्रचंड होती की, ते भूक तहान विसरून जायचे. ‘रमाई’ आपली इकडे गोवऱ्या थापून पैशाची बचत करून पैसे बाबासाहेबांना पाठवीत होत्या, आणि इकडे परिवार सांभाळीत होत्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तिमत्त्वाच्या यशामागे एक शांत, सहनशील, त्यागमय आणि संघर्षशील व्यक्ती उभी होती त्या म्हणजे रमाई भीमराव आंबेडकर, बाबासाहेबांच्या जीवन प्रवासातील कठीण काळात त्यांनी सावलीसारखी बाबासाहेबांना साथ दिली. स्वतःचे आयुष्य कष्टांत घालवून एका महान युगपुरुषाला घडविणाऱ्या रमाईंचे योगदान जगात फार मोठे आहे. केवळ कौटुंबिक नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातही अत्यंत मोलाचे आहे. गरीबी, संघर्ष यातूनच तिच्या आयुष्याची सुरुवात झाली
त्या काळात स्त्रीला शिक्षण घेण्यास मनाई होती, शिक्षणाचा अभाव, सामाजिक विषमता आणि आर्थिक हालअपेष्टा यामुळे त्यांच्या आयुष्याची वाटचाल सोपी नव्हती. परंतु संकटांना न घाबरता परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता रमाईत होती. अत्यंत लहान वयात त्यांचा विवाह भीमराव आंबेडकर यांच्याशी झाला. त्या वेळी बाबासाहेबही शिक्षणाच्या प्रवासात होते. पुढे बाबासाहेबांनी उच्च शिक्षणासाठी परदेश गाठले, परंतु मागे राहून संसाराची जबाबदारी सांभाळण्याचे मोठे ओझे रमाईच्या खांद्यावर आले. गरीबी, आजारपण, मुलांचे संगोपन आणि सामाजिक उपेक्षा यांचा सामना करत त्यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणात कधीही अडथळा येऊ दिला नाही. रमाईंच्या जीवनाचा सर्वात मोठा पैलू म्हणजे त्यांचा त्याग. बाबासाहेब शिक्षणासाठी आणि समाजकार्यासाठी झटले सर्वच ठिकाणी रमाईची बाबासाहेबांना साथ होती. मुलांचे आजारपण, आर्थिक अडचणी आणि सामाजिक तिरस्कार सहन करत त्यांनी संसाराचा गाडा पुढे नेला. रमाईचा संघर्ष केवळ वैयक्तिक नव्हता, तो सामाजिक परिवर्तनाचा होता. रमाईंचा त्याग म्हणजे एका स्त्रीने आपल्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा समाजहिताला दिलेले प्राधान्य होय.
तुम्ही काळजी करू नका, मी इकडे सर्व सांभाळून घेईन, हा त्यांचा शब्द बाबासाहेबांसाठी ऊर्जा, स्फूर्ती, नवी उमेद देणारा ठरला. ध्येयपूर्तीत कधीही आपल्या वैयक्तिक दुःखाचा अडसर येऊ दिला नाही.
बाबासाहेब म्हणतात, माझ्या यशात रमाचा सिंहाचा वाटा आहे. जर रमा माझ्या पाठीशी उभी राहिली नसती, तर मी आज जे काही आहे ते होऊ शकलो नसतो. एकदा बाबासाहेबांच्या वसतिगृहातील मुलांच्या जेवणाची सोय नव्हती, तेव्हा रमाईनी स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्या मुलांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. त्यांच्यासाठी केवळ स्वतःची मुलेच आपली नव्हती, तर संपूर्ण वंचित, दलित, पीडित शोषित समाज हा त्यांचा परिवार होता. आजही लोक त्यांना आदराने ‘माता रमाई’ म्हणतात. रमाईची राहणी अत्यंत साधी होती पण विचारसरणी उच्च होती. बाबासाहब बॅरिस्टर झाले, मोठे नेते झाले, साहेबांनी जगाचे दुःख दूर करावे, यातच तिचे सुख होते. रमाईच्या साधेपणातच त्यांचे मोठेपण सामावलेले होते. डॉ. बाबासाहेबांनी आपला ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ या प्रसिद्ध ग्रंथ रमाईंना अर्पण केला. त्यात त्यांनी लिहिले आहे की, जिच्या संयमामुळे आणि त्यागामुळे मी माझे शिक्षण पूर्ण करू शकलो आणि समाजाची सेवा करू शकलो, हीच रमाईच्या त्यागाची पावती आहे.
रमाईने 27 मे 1935 रोजी या जगाचा निरोप घेतला. आजच्या काळात जेव्हा आपण महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करतो, तेव्हा माता रमाईंचे चरित्र प्रत्येक स्त्रीसाठी आणि पुरुषासाठी प्रेरणादायी आहे. संकटकाळी न डगमगता, ध्येयावर लक्ष केंद्रित करून, आपल्या जोडीदाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची कला रमाईनी आपल्या कृतीतून शिकवली आहे.
रमाईंचे जीवन हे समाजातील वंचित, उपेक्षित आणि गरीब घटकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आयुष्यभर दुःख सहन केले, पण मनात कटुता ठेवली नाही संघर्षाशिवाय परिवर्तन शक्य नाही. स्त्री ही कुटुंबाचीच नव्हे तर समाजपरिवर्तनाची आधारस्तंभ असते, बाबासाहेबांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्यासाठी आवश्यक असलेली मानसिक शांतता रमाईंनीच दिली. बाबासाहेबांनी अस्पृश्यतेविरुद्ध, अन्यायाविरुद्ध आणि मानवतेसाठी केलेला संघर्ष जगाला दिसतो, परंतु त्या संघर्षामागील कष्ट, वेदना आणि त्याग समजून घेतला तर रमाईंचे व्यक्तिमत्त्व अधिक मोठे वाटेते.
रमाईंचे आयुष्य हे कष्ट, दुःख आणि त्याग यांचे प्रतीक असले तरी त्यात करुणा आणि प्रेमाचा पाझर होता. त्यांनी कधीही परिस्थितीला दोष दिला नाही. त्यांच्या शांत स्वभावात एक अद्भुत ताकद होती. त्या स्वतः अंधारात राहिल्या, पण बाबासाहेबांच्या रूपाने समाजाला प्रकाश दिला. रमाईने स्वतःच्या आयुष्याचा विचार न करता एका महान ध्येयासाठी आयुष्य समर्पित केले. इतिहासात अनेक महान पुरुषांची नावे नोंदली जातात, परंतु त्या पुरुषांना घडविणाऱ्या स्त्रियांचे योगदान अनेकदा दुर्लक्षित राहते. रमाईंचे जीवन हे त्या अदृश्य शक्तीचे प्रतीक आहे.
माता रमाई, तुमच्या कष्टाला, तुमच्या त्यागाला वंदन…! माता रमाईंना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन…!
प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण















