prabodhini news logo
Home ठळक बातम्या दलित विधवा महिलेचे घर बुलडोझरने पाडल्याचा निषेध

दलित विधवा महिलेचे घर बुलडोझरने पाडल्याचा निषेध

0
89

वंचित बहुजन आघाडीचे नागपुरात धरणे आंदोलन

कुमुद फुलझेले महिला जिल्हा प्रतिनिधी, नागपूर – कुही तालुक्यातील मालची येथे एका दलित विधवा महिलेचे ४० वर्षे जुने घर प्रशासनाने बुलडोझर लावून पाडले. या घटनेचा निषेध करण्यासाठी ‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने संविधान चौक येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ही कारवाई विकास नसून ‘जातीय दहशत’ असल्याचा सांगितले. वंचित बहुजन आघाडीने दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

नेमकी घटना काय?

२३ जानेवारी रोजी बानोर ग्रामपंचायत हद्दीतील मालची गावात कुलवंता प्रेमदास बोरकर या विधवा महिलेचे वडिलोपार्जित घर अतिक्रमण निर्मूलनाच्या नावाखाली पाडण्यात आले. सरपंच बंडू नरुले आणि सचिव बी. बी. भोयर यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी केवळ घरच पाडले नाही, तर परिसरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात आली आणि कुटुंबाला जातीयवाचक शिवीगाळही करण्यात आली. १५ दिवस उलटूनही पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल न केल्याने संताप व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या प्रमुख मागण्या:

१) सरपंच बंडू नरुले व सचिव बी. बी. भोयर यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत.

२) पीडित महिला कुलवंता बोरकर यांना शासनातर्फे १० लाख रुपयांची मदत मिळावी.

३) ज्या ठिकाणी घर पाडण्यात आले, त्याच जागेचा शासकीय पट्टा बोरकर कुटुंबाला देण्यात यावा.

४);कारवाईच्या वेळी उपस्थित असलेल्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी.

हे आंदोलन जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांच्या नेतृत्वात पार पडले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य कुशल मेश्राम, प्रा. अनिकेत मून, राहुल वानखेडे, शहराध्यक्ष मंगेश वानखेडे, महानंदा राऊत, अनिरुद्ध मडके, सी.सी. वासे यांसह भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांची मोठी गर्दी होती. नागरिकांनी हातात फलक घेऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. जर शासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेतली नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र बेमुदत आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here