
प्रबोधिनी न्युज नेटवर्क – कानपूरमध्ये धक्कादायक घटना घडली. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका आलिशान लॅम्बोर्गिनी कारने रविवारी दुपारी रस्त्यावर मोठा गोंधळ घातला. ग्वाल टोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत या आलिशान कारने उभ्या असलेल्या दुचाकीला आणि रिक्षाला जोरदार धडक दिली.
प्रसिद्ध तंबाखू व्यावसायिक के. के. मिश्रा यांचा मुलगा शिवम कुमार मिश्रा याने चालवलेल्या या कारने एका रिक्षेला आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार १० फूट हवेत फेकला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
रविवारी दुपारी ३:१५ च्या सुमारास रेव्ह-३ मॉल परिसरात हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दिल्ली पासिंगची ‘लॅम्बोर्गिनी रेव्ह्युएल्टो’ अत्यंत वेगात होती. त्या
कारने सुरुवातीला एका रिक्षेला उडवले. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या ‘रॉयल एनफिल्ड’ला धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, तौफिक अहमद नावाचा तरुण दुचाकीसह १० फूट हवेत उडाला. दुचाकीला धडक दिल्यावर कार थांबली नाही, तर दुचाकीला फरफटत नेत थेट एका विजेच्या खांबाला धडकली.
जखमींची प्रकृती गंभीर
या अपघातात तौफिक अहमद गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर काही जणांनाही गंभीर फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर एक वेगळाच ड्रामा पाहायला मिळाला. शिवम मिश्रा याला वाचवण्यासाठी त्याच्या मागे दुसऱ्या कारमध्ये असलेल्या बाऊन्सर्सनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या लोकांशी हुज्जत घातली आणि गैरवर्तन केले.
यामुळे संतप्त झालेल्या जमावाने लॅम्बोर्गिनीच्या काचा फोडून कारची तोडफोड केली. आणि चालक शिवमला कारबाहेर ओढून काढले.
वातावरण तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी मध्यस्थी करत शिवमला जमावाच्या तावडीतून सोडवले. सध्या ही १० कोटींची कार पोलिसांनी जप्त केली असून, पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.















