prabodhini news logo
Home अहेरी मृतावस्थेत असणाऱ्या आरोग्य सेवेला जीवनदान दया – शिवसेना

मृतावस्थेत असणाऱ्या आरोग्य सेवेला जीवनदान दया – शिवसेना

0
152

तालुका मुख्यालयात रक्तपेढी सुरू करून नवीन अँब्युलन्स प्रत्येक दवाखान्यात उपलब्ध करा

अहेरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी व भामरागड तालुक्यातील पहिला दौरा मुळे अहेरी उपविभागातील भामरागड तालुक्यातील मृतावस्थेत असणाऱ्या आरोग्य सेवेला जीवनदान मिळावे अशी विनंती शिंदे शिवसेना च्या वतीने आरोग्य मंत्री साहेबाना जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे यांच्या मार्गदर्शनात अहेरी विधानसभा प्रमुख नेतृत्वात तालुका प्रमुख सुधाकर तीम्मा व तालुका कार्यकारणी यांच्या हस्ते निवेदना मार्फत देण्यात आले, गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल भामरागड तालुक्यात एक उपजिल्हा रुग्णालय, चार प्राथमिक आरोग्य केंद्रे, वीस उपकेंद्रे व दोन आरोग्य पथके मंजूर आहेत. मात्र संपूर्ण तालुक्यात पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, दंत चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी व इतर आवश्यक मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे.
या मनुष्यबळाच्या अभावामुळे तालुक्यातील रुग्णांना वेळेवर व योग्य उपचार मिळत नाहीत. परिणामी अनेक गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालयात रेफर करावे लागत असून, दूरचा प्रवास व आर्थिक अडचणींमुळे स्थानिक गरीब व निष्पाप आदिवासी रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. काही दुर्दैवी प्रकरणांमध्ये रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
तरी रुग्णांची ही होणारी हेळसांड थांबविण्यासाठी भामरागड तालुक्यातील आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरून तालुक्यातील रुग्णांना व जनतेला दिलासा देण्यात यावा.

भामरागड येथील उपजिल्हा रुग्णालयास दर्जा मंजूर झालेला असतानाही त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. सदर दर्जा त्वरित अमलात आणण्यात यावा.

तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात मोकळ्या अवस्थेत असलेला ऑक्सिजन प्लांट तात्काळ कार्यान्वित करण्यात यावा.

प्राथमिक आरोग्य केंद्र कोठी येथे इमारतीचे उद्घाटन झालेले असून त्या ठिकाणी पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.

तसेच ताडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम त्वरित सुरू करण्यात यावे.

भामरागड तालुक्यात वैद्यकीय सेवेच्या अभावामुळे रुग्णांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करण्यात यावी.

तसेच भामरागड तालुक्यात ऍनिमियाचे प्रमाण जास्त असून गरोदर मातांना व गंभीर रुग्णांना वारंवार रक्ताची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे तालुक्यात तात्काळ रक्तपेढी (ब्लड बँक) सुरू करण्यात यावी.

रुग्णांना ने-आण करण्यासाठी पुरेशा संख्येने रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) खराब अवस्थेत असल्यामुळे रेफर केलेला रुग्ण रुग्णालयात पोचण्याची शाश्वती नसल्यामुळे नवीन अँब्युलन्स तालुक्यातील प्रत्येकरुग्णालयात उपलब्ध करून देण्यात याव्यात.

वरील अत्यंत गंभीर विषयाकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष देऊन तालुक्यातील मृतावस्थेत असणाऱ्या आरोग्य सेवेला जीवनदान देण्याचे करावे अशी मागणी निवेदन मार्फत करण्यात आली तेव्हाविनोद पुनघाटी जगदीश दुर्वा रानू लेकमी चमरू वेडा रामजी माड़वी मनोज वाचमी संतोष पुनघाटी बंडू वाचकी मधुकर तेलामी चैतू पीडसे जगन्नाथ ताडो रमेश तीम्मा लेबु दुर्वा अजेय कुमटी सूरज दुर्वा अमर नोरोटी लालसू दुर्वा दिनकर मड़कामी सुरेश तेलामी उर्मिला पुनघाटी मनकी अबका विजय पुनघाटी राहुल हेडो संकर माजी व ईतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here