prabodhini news logo
Home चंद्रपूर ‘कॅम्पा’ प्रकल्पांतर्गत पारंपारिक बांबू कारागिरांचे सक्षमीकरण

‘कॅम्पा’ प्रकल्पांतर्गत पारंपारिक बांबू कारागिरांचे सक्षमीकरण

0
70

चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दि. 22 : कॅम्पा प्रकल्पांतर्गत मोहर्ली बांबू क्षेत्रातील पारंपारिक कारागीर समुदायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने आयोजित 15 दिवसीय ‘बांबू बास्केट्री’ प्रशिक्षण कार्यक्रमाचा नुकताच यशस्वी समारोप झाला.

या प्रशिक्षणात स्थानिक महिलांनी बांबूपासून विविध आकर्षक व बाजारपेठेत मागणी असलेल्या वस्तू तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केले. पारंपारिक टोपल्यांबरोबरच बांबू चटई, बांबू बुके, बांबूची फुले, बांबू बॅच आदी आधुनिक व कलात्मक वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. पारंपरिक कलेला आधुनिकतेची जोड मिळाल्याने तयार झालेल्या वस्तू अधिक व्यावसायिक आणि दर्जेदार ठरल्या आहेत.

समारोपप्रसंगी आयोजकांनी सांगितले की, बांबू कारागिरांच्या हाताला काम मिळवून देणे आणि त्यांच्या कलेला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. महिलांनी तयार केलेल्या वस्तू त्यांच्या आर्थिक प्रगतीस निश्चितच चालना देतील. कार्यक्रमादरम्यान महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शनही भरविण्यात आले. गावाच्या सरपंच श्रीमती काटकर तसेच वन परिक्षेत्र अधिकारी श्री. थीपे यांनी महिलांच्या कौशल्याचे विशेष कौतुक केले.

सदर प्रशिक्षणाचे आयोजन बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र यांनी केले. प्रशिक्षणाचे नियोजन पर्यवेक्षक योगिता साठवणे यांनी केले असून सहाय्यक म्हणून सुनिता मोकाशे, प्रशिक्षक बांबू सखी मनिषा नन्नावरे व अनिता भोयर तसेच विशेष प्रशिक्षक संतोष बजाईत यांनी मोलाची भूमिका बजावली. हा प्रशिक्षण कार्यक्रम बीआरटीसीचे संचालक मनोज खैरनार, वन परिक्षेत्र अधिकारी आकाश माल्लेलवार, यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन : कौशल्य विकासासोबतच कारागिरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षण कालावधीत विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सहभागी महिलांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली तसेच त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here