
पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – पुणे शहरातील गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गावी जाण्यासाठी फलाटावर झोपलेल्या एका मजूर कुटुंबातील ४ वर्षांच्या चिमुकलीला खाऊचे आमिष दाखवून पळवून नेल्याची आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. मात्र, रेल्वे पोलिसांनी तत्परता दाखवत सीसीटीव्हीच्या आधारे अवघ्या साडेचार तासांत नराधमाला बेड्या ठोकल्या.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मूळची मध्य प्रदेशातील असून तिचे कुटुंबीय पुण्यात मोलमजुरी करतात. मंगळवारी मध्यरात्री हे कुटुंब मध्य प्रदेशातील खांडवा येथे जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आले होते. रेल्वेची वाट पाहत असताना फलाट क्रमांक ३ वर सर्वजण झोपले होते.
याच संधीचा फायदा घेत आरोपी महेश यादव (वय २५) याने चिमुकलीला खाऊ देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला. रात्री दीडच्या सुमारास मुलीचे वडील जागे झाले असता त्यांना मुलगी गायब असल्याचे समजले. त्यांनी तातडीने रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) तातडीने तपासाची चक्रे फिरवली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक संशयित तरुण मुलीला हात धरून फलाटाच्या टोकाला घेऊन जाताना दिसला. पोलिसांनी शोध मोहीम तीव्र केली आणि पहाटे ६ च्या सुमारास पार्सल गेट जवळून आरोपीला अटक केली व मुलीची सुटका केली. आरोपी महेश यादव (वय २५) याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार बलात्कार, अपहरण आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी हा पीडित कुटुंबाच्या परिचयाचा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पीडित मुलीला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, रेल्वे स्थानकासारख्या सार्वजनिक आणि वर्दळीच्या ठिकाणी अशा घटना घडत असल्याने प्रवाशांच्या, विशेषतः महिला व बालकांच्या सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.















