prabodhini news logo
Home ठळक बातम्या बोलिव्हियामध्ये नोटांनी भरलेले विमान कोसळले, १५ जणांचा मृत्यू: ३० जखमी

बोलिव्हियामध्ये नोटांनी भरलेले विमान कोसळले, १५ जणांचा मृत्यू: ३० जखमी

0
86

प्रबोधिनी न्युज नेटवर्क – एल अल्टो (बोलिव्हिया): बोलिव्हियातील एल अल्टो शहरात शनिवारी सकाळी (भारतीय वेळेनुसार) एका भीषण विमान अपघाताने खळबळ उडाली आहे. बोलिव्हियन वायूसेनेचे ‘हर्क्युलस’ विमान धावपट्टीवरून घसरून महामार्गावर कोसळल्याने १५ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या विमानातून मध्यवर्ती बँकेच्या नवीन नोटांची वाहतूक केली जात होती.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या (सेंट्रल बँक) नवीन नोटा घेऊन हे विमान निघाले होते. मात्र, एल अल्टो आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करत असताना खराब हवामानाचा फटका बसला. विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते धावपट्टीवरून घसरून थेट जवळच्या गजबजलेल्या रस्त्यावर जाऊन धडकले.

विमान रस्त्यावर कोसळल्याने तिथे उभ्या असलेल्या १० ते १५ कार विमानाखाली दबल्या गेल्या. धडक इतकी जोरात होती की अजस्त्र हर्क्युलस विमानाचे दोन तुकडे झाले. अपघातानंतर विमानातील नोटांचे बंडल रस्त्यावर विखुरले गेले. या अपघातानंतर एल अल्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले.

बोलिव्हियन वायूसेनेने या वृत्ताला दुजोरा दिला असून, जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय एअरलाइनने स्पष्ट केले की, दुर्घटनाग्रस्त विमान त्यांच्या ताफ्यातील नसून ते बोलिव्हियन एअर फोर्सचे विमान होते. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दाखवलेल्या दृश्यांमध्ये विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे. अपघातामुळे विमानाचे दोन तुकडे झाले आहेत.

बोलिव्हियाची सेंट्रल बँक आज या घटनेवर अधिकृत पत्रकार परिषद घेणार आहे. अपघाताच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आले आहे. प्रशासन मृतांची ओळख पटवण्याचे आणि नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here