prabodhini news logo
Home ठळक बातम्या राज्यात पुन्हा उन्हाचा तडाखा: विदर्भात पारा ४७ अंशांच्या उंबरठ्यावर; आता ‘अतिउष्णतेचा’ इशारा

राज्यात पुन्हा उन्हाचा तडाखा: विदर्भात पारा ४७ अंशांच्या उंबरठ्यावर; आता ‘अतिउष्णतेचा’ इशारा

0
34

प्रबोधिनी न्युज नेटवर्क – राज्यात काही दिवसांपूर्वी पूर्वमोसमी पावसामुळे मिळालेला दिलासा आता संपुष्टात आला असून, पुन्हा एकदा उष्णतेने डोके वर काढले आहे. हवामान विभागाने पुढील 24 ते 48 तास राज्यासाठी अतिउष्णतेचा इशारा जारी केला असून, किनारपट्टी भागांसह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा अधिक चढणार असल्याचे संकेत दिसून येत आहे.

मुंबई, पुण्यासारख्या शहरांत उकाडा वाढणार असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील दोन दिवस उष्णतेची लाट अधिक तीव्र राहण्याची शक्यता असून त्यानंतर 28 आणि 29 एप्रिलदरम्यान काही भागांत ढगाळ वातावरण तयार होऊ शकते, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचे हॉटस्पॉट

एप्रिलच्या अखेरीस उत्तर महाराष्ट्रात सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमान 41 अंशांच्या पुढे गेले असून जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांत उष्णतेने विक्रमी पातळी गाठली आहे. जळगावमध्ये 44.3 अंश, नंदुरबार आणि धुळ्यात 44 अंश तापमानाची नोंद झाली. अहिल्यानगरमध्येही पारा 41 अंशांवर पोहोचला.

विदर्भात उष्णतेचा कहर कायम

विदर्भात उष्णतेचा मुक्काम आणखी लांबण्याची चिन्हे आहेत. चार जिल्ह्यांत तापमान 47 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचत असून अकोल्यात रविवारी 46.9 अंश तापमान नोंदवले गेले. यामुळे 2019 च्या विक्रमालाही धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाने पुढील 48 तास विदर्भासाठी अतिउष्णतेचा गंभीर इशारा दिला आहे.

29 एप्रिल ते 12 मे काळजीचा काळ
हवामान खात्याने 29 एप्रिल ते 12 मे दरम्यान तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळणे, पुरेसे पाणी पिणे आणि आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

राज्यात पूर्वमोसमी पावसाने दिलासा दिला असला तरी आता पुन्हा उष्णतेची परीक्षा सुरू झाली आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी अधिक कठीण ठरण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here