
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : शहरातील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार अन्नातून विषबाधा (फूड पॉइझनिंग) झाल्याचा संशय व्यक्त केला जात असला, तरी मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
मृतांमध्ये अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या दोन मुली आयशा व झैनब यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २५ तारखेला रात्री कुटुंबीयांनी नातेवाईकांसोबत एकत्र जेवण केले होते. बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ले असता काही वेळातच चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला.
प्रकृती अचानक बिघडल्याने सर्वांना तातडीने सर जे. जे. रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या संदर्भात परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी सांगितले की, प्रकरणाची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. कुटुंबाने सेवन केलेल्या बिर्याणी आणि कलिंगडाचे नमुने जप्त करण्यात आले आहेत. तसेच शवविच्छेदन करून व्हिसेरा नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
मृत्यूपूर्वी कुटुंबातील एका सदस्याने दिलेल्या जबाबात बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे अन्नातून विषबाधेची शक्यता नाकारता येत नसली, तरी पोलिसांनी कोणतेही ठोस कारण अद्याप निश्चित केलेले नाही.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पोस्टमॉर्टेम व फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे अन्नसुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, सर्वांचे लक्ष आता अहवालाकडे लागले आहे.















