
मीरा-भाईंदर – मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या (MBMC) पुढाकाराने आणि APAC Media च्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली National Sustainable Urban Innovation Summit (NSUIS) 2026 ही राष्ट्रीय स्तरावरील परिषद २८ एप्रिल रोजी मुंबईतील ताज प्रेसिडेंट येथे यशस्वीरीत्या पार पडली. “विकसित भारत, विकसित महाराष्ट्र” या संकल्पनेला चालना देणारी ही परिषद ठरली.
या परिषदेला महापौर डिंपल मेहता, आयुक्त राधाबिनोद ए. शर्मा (IAS) आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते. देशभरातील आयएएस अधिकारी, महापौर, नगर आयुक्त, तज्ज्ञ, अभियंते, धोरणकर्ते आणि शहरी नियोजन क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला.
परिषदेचे मुख्य आकर्षण म्हणजे MMRDA चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांचे प्रमुख व्याख्यान. त्यांनी एकात्मिक महानगरीय नियोजन, शाश्वत पायाभूत सुविधा आणि प्रादेशिक समन्वय यांचे महत्त्व अधोरेखित केले.
या परिषदेत स्मार्ट शहरे, डेटा-आधारित प्रशासन, सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP), जल व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि हवामान बदल या विषयांवर सखोल चर्चा झाली. नागरिक-केंद्रित सेवा, ई-गव्हर्नन्स आणि मोबाईल अॅप्सद्वारे सेवा वितरण यावर विशेष भर देण्यात आला.
तांत्रिक सत्रांमध्ये केरळ, तेलंगणा, झारखंडसह विविध राज्यांतील अधिकाऱ्यांनी आपल्या राज्यातील यशस्वी उपक्रम मांडले. तसेच नेदरलँड्सच्या वाणिज्य दूतावासाचे प्रतिनिधी श्री थियरी व्हान हेल्डेन यांनी जागतिक स्तरावर शहरे विकसित करताना निसर्गाशी सुसंगतता राखण्यावर भर दिला.
परिषदेत शाश्वत नागरी विकासासाठी ग्रीन बाँड्स, ESG फायनान्सिंग, आणि नवकल्पनात्मक निधी उभारणी यावरही चर्चा झाली. मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या उपाध्यक्ष श्रध्दा वाडे यांनी यावर मार्गदर्शन केले.
मीरा-भाईंदर शहराच्या सर्वांगीण विकास प्रवासावरही विशेष सादरीकरण करण्यात आले. मर्यादित संसाधनांमध्ये स्वच्छता, स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल सेवा, जल व्यवस्थापन आणि पर्यावरणीय उपक्रमांमुळे शहराने केलेली प्रगती अधोरेखित करण्यात आली.
परिषदेच्या समारोपप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रियांका राजपूत यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. तसेच परिषदेतून मिळालेल्या निष्कर्षांची अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच सविस्तर अहवाल जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
मोजीस परमार
विशेष प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
mojissports@gmail.com
8104170564















