prabodhini news logo
Home अकोला हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता...

हातमजुरी करणाऱ्या मजुराची मुलगी बनली टॅक्स असिस्टंट अधिकारी ; ट्युशन न लावता एकाच वेळी केल्या तीन स्पर्धा परीक्षा पास

0
5

वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केला आई-वडिलांसह मुलीचा सत्कार!

अकोला प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : परिस्थिती कितीही बेताची असली, तरी मनात जिद्द आणि मेहनतीची तयारी असेल तर आकाशालाही गवसणी घालता येते, हे अकोला तालुक्यातील धोर्तडी येथील हातमजुरी करणारे दीपक आठवले यांची मुलगी मोनाली आठवले हिने सिद्ध करून दाखवले आहे. कोणतीही ट्युशन न लावता एकाच वेळी तीन स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करत तिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

लहानपणापासूनच मोनालीची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वडील दीपक आठवले गावात मिळेल ते काम तसेच नळ फिटिंगचे मजूर म्हणून काम करतात, तर आई शेतीची कामे करते. मोनालीचे प्राथमिक शिक्षण धोर्तडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद कन्याशाळा, अकोला येथे झाले. शिष्यवृत्तीच्या पैशावर तिने एम.कॉम.पर्यंत उच्चशिक्षण पूर्ण केले.

घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे कोणतीही ट्युशन न लावता मोनालीने घरीच अभ्यास करून एकाच वेळी समाजकल्याण विभागात लिपिक, उच्च न्यायालयात बेलिफ आणि सेल टॅक्स विभागात टॅक्स असिस्टंट अधिकारी या तीनही स्पर्धा परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्या. या तीन परीक्षांपैकी ती टॅक्स असिस्टंट अधिकारी पदावर नियुक्ती स्वीकारणार आहे.

या यशाची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर यांनी मोनालीच्या धोर्तडी येथील घरी जाऊन आई-वडिलांसह तिचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोनालीने मिळवलेले यश हे गावातीलच नव्हे, तर सर्व समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे गौरवोद्गार जिल्हा पदाधिकाऱ्यांनी यावेळी काढले.

यावेळी वंचित बहुजन आघाडी सांगळूद सर्कल अध्यक्ष अमित खंडारे, भारीप बहुजन अकोला तालुका माजी महासचिव प्रदीप पळसपगार, हिम्मत वानखडे, प्रमोद वानखडे, सुधाकर मालठाने, सुरेश गवळी, माजी उपसरपंच परेश ढवळे, राजूभाऊ बिलेवार, संजय किर्तक, उमेश वानखडे, ज्ञानेश्वर वानखडे, संजय वानखडे, राहुल वानखडे, प्रतीक आठवले, उमेश देवतळे, दीपक आठवले यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मोनाली आठवले म्हणाली, “वडील दीपक आठवले हे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत सुरुवातीच्या काळापासून सक्रिय असल्यामुळे आमच्या घरात आंबेडकरी विचार रुजले आणि त्यामुळेच मनात जिद्द ठेवून मी हे यश संपादन करू शकले.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here