prabodhini news logo
Home एटापल्ली नैतला गाव आता ‘पेसा ग्राम’ म्हणून ओळखले जाणार; भाकपाच्या पाठपुराव्याला यश

नैतला गाव आता ‘पेसा ग्राम’ म्हणून ओळखले जाणार; भाकपाच्या पाठपुराव्याला यश

0
114

एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : ग्रामपंचायत गर्देवाडा अंतर्गत येणाऱ्या नैतला गावातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी अखेर मार्गी लागली आहे. नैतला गाव आता ‘पेसा ग्राम’ म्हणून घोषित होणार असून, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकपा) यासाठी केलेल्या विशेष पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव संचालक, राज्य पेसा कक्ष, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालय यांना सादर करण्यात आला असून, लवकरच नैतला हे पेसा गाव म्हणून घोषित होणार आहे.
नैतला हे पूर्णपणे माडिया (आदिवासी) बहुल गाव असून, येथील नागरिक आपल्या पारंपरिक जीवनपद्धतीनुसार उदरनिर्वाह करतात. सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या हे गाव आदिवासी परंपरेशी घट्टपणे जोडलेले आहे. पेसा कायद्यांतर्गत गावाला स्वायत्तता मिळावी आणि ग्रामसभा सशक्त व्हावी, अशी येथील नागरिकांची इच्छा होती. ही बाब ग्रामस्थांनी भाकपाच्या नेत्यांच्या कानावर घातली होती.
‘भाकपा’ने पूर्ण केले दिलेले आश्वासन
नैतला गावातील जनतेने भाकपावर विश्वास टाकला होता आणि पक्षानेही तो विश्वास सार्थ ठरवला आहे. याबाबत बोलताना भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले की, “आम्हाला सत्तेचा मोह नसून केवळ जनतेची सेवा करण्यासाठी सत्ता पाहिजे. नैतला गावाचा प्रस्ताव आम्ही शासन स्तरावर यशस्वीपणे पोहोचवला आहे. जो गाव आगामी निवडणुकीत भाकपाला साथ देईल, त्या गावातील रस्ते, पाणी, वीज आणि इतर सर्व मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
पेसा ग्राम झाल्यामुळे होणारे फायदे
नैतला गाव पेसा ग्राम म्हणून घोषित झाल्यामुळे आता स्थानिक ग्रामसभेला विशेष अधिकार प्राप्त होणार आहेत. नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, गावाच्या विकासाचे निर्णय आणि शासन स्तरावरील निर्णयांमध्ये स्थानिकांचा थेट सहभाग वाढणार आहे. यामुळे आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे.
पुणे येथील कार्यालयात प्रस्ताव सादर झाल्यामुळे आता अंतिम घोषणेची औपचारिकता बाकी असून, भाकपाच्या या यशस्वी पुढाकारामुळे नैतला गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here