prabodhini news logo
Home चंद्रपूर म्हाडा अंतर्गत १४४ कोटींच्या विकासकामांचा आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतला आढावा

म्हाडा अंतर्गत १४४ कोटींच्या विकासकामांचा आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतला आढावा

0
78

दुसऱ्या टप्यातील विकास आराखडा शासनाकडे सादर, नागपूर येथे म्हाडा अधिकाऱ्यासह बैठक घेत चर्चा

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – नवीन चंद्रपूर च्या नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेत म्हाडा अंतर्गत विविध विकासकामांना गती दिली असून, पहिल्या टप्प्यातील तब्बल १४४ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हाडाच्या नागपूर विभागीय कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत विकासकामांच्या अंमलबजावणीबाबत सखोल चर्चा केली.
बैठकीदरम्यान प्रस्तावित विकासकामांचे आराखडे, तांत्रिक बाबी, प्रशासकीय प्रक्रिया तसेच कामांची अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विकासकामे दर्जेदार, लोकाभिमुख आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी आमदार जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय इंगोले यांच्याशीही विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर शहराच्या वाढत्या नागरीकरणाचा मुद्दा ठळकपणे मांडला. सन १९९८ मध्ये म्हाडाची स्थापना करण्यात आली होती. त्यानुसार त्या काळात येथील विकास आराखडा तयार करण्यात आला. मात्र गेल्या काही वर्षांत येथे मोठ्या प्रमाणात नागरीवस्ती वाढली आहे. त्यामुळे नागरिकांसाठी मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक सोयीसुविधा आणि इतर पायाभूत विकासकामांची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली असल्याचे ते यावेळी म्हणाले.
आमदार जोरगेवार यांनी पुढे सांगितले की, म्हाडा अंतर्गत तब्बल १ हजार ३९१.७१ हेक्टर जागा आरक्षित करण्यात आली असून, त्यापैकी जवळपास २०० हेक्टर जागा संपादित करण्यात आली आहे. या संपूर्ण क्षेत्राचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी जवळपास ११ हजार कोटी रुपयांचा एकत्रित प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या विकासकामांसाठी शासनाने तीन टप्प्यांची रूपरेषा निश्चित केली असून, त्यातील पहिल्या टप्प्यासाठी १४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर दुसऱ्या टप्यातील विकासकामांसाठी २४२ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
नवीन चंद्रपूर येथील भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आधुनिक आणि दीर्घकालीन विकास साधण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीस विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे सदर निधी संदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनातही हा विषय उपस्थित केला होता. त्यांनतर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.या संदर्भात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. पुढे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री झाल्यानंतरही आमदार जोरगेवार यांनी त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवत निधी मंजुरीसाठी प्रयत्न सुरू ठेवले.
दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांनी २२ मे २०२५ रोजी नागपूर येथील म्हाडा कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत म्हाडा नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश कुमार मेघमाडे, कार्यकारी अभियंता दीप्ती काळे, अभियंता मोनिका थोटे, एडीटीपी भाग्यश्री टाक विद्युत विभागाचे उपअभियंता चंद्रशेखर वानखेडे व करण नायर उपस्थित होते. या बैठकीत विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यानंतर मुंबई मंत्रालयात ७ मे २०२५ ला म्हाडा गृहनिर्माणचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासोबतही आमदार किशोर जोरगेवार यांनी बैठक घेतली. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना विकास आराखडा तयार करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.या सर्व प्रयत्नांनंतर आता या विकासकामांसाठी निधी मंजूर झाला असून, लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे. या निधीतून म्हाडा अंतर्गत दाताळा, कोसारा, पडोली या भागांमध्ये मुख्य डीपी रस्ते, स्ट्रीट लाईट, बंदिस्त नाली आदी मूलभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here