
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : दिल्ली येथील रामलीला मैदानावर 24 मे रोजी आयोजित जनजाती संगम कार्यक्रमात देशाचे गृहमंत्री मा. अमित शाह यांनी आदिवासी समाजाचा उल्लेख वारंवार “वनवासी” असा केल्याच्या पार्श्वभूमीवर आदिवासी काँग्रेसच्या वतीने गडचिरोली प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
पत्रकार परिषदेत बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “आदिवासी” हा शब्द केवळ एक सामाजिक ओळख नसून तो इतिहास, संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. त्यामुळे आदिवासी समाजाला “वनवासी” म्हणून संबोधणे म्हणजे त्यांच्या मूळ अस्मितेलाच नाकारण्याचा प्रयत्न असल्याची भावना समाजामध्ये निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विक्रांत भुरिया आणि महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष मा. वसंत पुरके यांच्या मार्गदर्शनाखाली या वक्तव्याचा निषेध करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने गडचिरोली प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी आदिवासी समाजात धर्मांतरणाच्या मुद्द्यावरून संभ्रम आणि भीती निर्माण केली जात असल्याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली. धर्मांतरित आदिवासींचे आरक्षण रद्द होईल, अशा स्वरूपाचा प्रचार काही ठिकाणी सुरू असल्याने समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. अशा घडामोडींमुळे भविष्यात आदिवासी समाजातच परस्पर संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
“आदिवासींना स्वतंत्र धर्मापेक्षा स्वतःची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि जीवनमूल्ये लाभलेली आहेत. ‘आदिवासी’ ही ओळख त्यांच्या अस्तित्वाचा आणि स्वाभिमानाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे ‘वनवासी’ हा शब्दप्रयोग समाजाच्या भावना दुखावणारा असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो,” असे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माधवराव गावड, राष्ट्रीय समन्वयक कुसुमताई आलाम, काँग्रेसच्या सदस्या आरती कंगाले, आनंद कंगाले तसेच आदिवासी काँग्रेसचे जिल्हा सचिव सोनू (लीलाधर )आलाम आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेतून केंद्र सरकारने आदिवासी समाजाच्या ऐतिहासिक ओळखीचा आदर राखावा आणि समाजाच्या भावना दुखावतील असे शब्दप्रयोग टाळावेत, अशी मागणी करण्यात आली…















