
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज, सिंदेवाही : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही उपक्षेत्रातील मौजा हजारीचक येथे एका शेतातील विहिरीत पडून ७ ते ८ वर्षे वयाच्या नर वाघाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वन्यजीव संवर्धनाबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतातील सिमेंटच्या विहिरीला संरक्षक कठडे नसल्याने वाघाचा तोल जाऊन तो विहिरीत पडला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मृत वाघाला विहिरीबाहेर काढले.
यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले असून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृत वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वनविभागाने या घटनेचा सखोल तपास सुरू केला असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, जंगलालगतच्या भागांमध्ये उघड्या व कठडाविरहित विहिरी वन्यप्राण्यांसाठी मोठा धोका ठरत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
वनविभागाने तसेच पर्यावरणप्रेमींनी शेतकऱ्यांना आपल्या विहिरींना संरक्षक कठडे, जाळ्या किंवा अन्य सुरक्षा उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. अशा उपाययोजनांमुळे वाघ, बिबट्या, हरिण, रानडुक्कर यांसारख्या वन्यप्राण्यांचे जीव वाचू शकतात आणि भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळता येऊ शकतात.
या घटनेमुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.















