prabodhini news logo
Home अहेरी भाकपाच्या पाठपुराव्याला यश ; अखेर अहेरी नगरपंचायत प्रभाग क्र. ०४ मधील रस्त्याच्या...

भाकपाच्या पाठपुराव्याला यश ; अखेर अहेरी नगरपंचायत प्रभाग क्र. ०४ मधील रस्त्याच्या कामाला सुरुवात

0
53

अहेरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या प्रयत्नातून अखेर अहेरी नगरपंचायत प्रभाग क्र. ०४ मधील रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. गेल्या अनेक महिन्यांपासून विविध कारणांमुळे ज्ञानेश्वर निमसरकार ते कमल आत्राम यांच्या घरापर्यंतचा सी.सी. रोड प्रलंबित होता. त्यामुळे वॉर्डातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता.

या संदर्भात स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नगर पंचायत कार्यालयात जाऊन तक्रारी व मागण्या केल्या, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. शेवटी नागरिकांनी भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्याकडे निवेदन देऊन समस्या मांडली.

त्यानंतर कॉ. सचिन मोतकुरवार यांनी मुख्याधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून नागरिकांच्या समस्येबाबत लक्ष वेधले व रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून याबद्दल वॉर्डातील नागरिकांकडून भारतीय कम्युनिष्ट पक्ष व कॉ. सचिन मोतकुरवार यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

यावेळी कॉ. सचिन मोतकुरवार यांनी सांगितले की, “अहेरी नगरपंचायत प्रभाग क्र. ०४ मधील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी वारंवार त्रास सहन करावा लागत होता. हा रस्ता केवळ विकासाचे काम नसून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होता. भाकपा नेहमीच जनतेच्या प्रश्नांसाठी लढत आली आहे आणि पुढेही रस्ता, पाणी, वीज, शिक्षण व आरोग्य यांसारख्या मूलभूत हक्कांसाठी आम्ही सातत्याने संघर्ष करत राहू.”

तसेच भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की, जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी लाल झेंडा नेहमीच जनतेसोबत खंबीरपणे उभा राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here