prabodhini news logo
Home ठळक बातम्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट; वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने डॉक्टराविरुद्ध गुन्हा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट; वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल!

0
45

पारनेर (अहमदनगर) : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि समाजात द्वेष निर्माण करणारा मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात एका डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे पारनेर युवक तालुकाध्यक्ष संकेत विनायक पटेकर यांनी पोलिसांत अधिकृत फिर्याद दिली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पारनेर तालुकाध्यक्ष बाळासाहेब पातारे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली ही कायदेशीर लढाई लढली जात असून, त्यांच्याच पुढाकाराने पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करतेवेळी पारनेर पोलीस ठाण्याचे एपीआय (API) नितीन खंडागळे यांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

महापुरुषाचा बुद्धिपुरस्सर अवमान केल्याची माहिती मिळताच भाळवणी परिसरातील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी अधिकृत गुन्हा नोंदवण्याच्या एक दिवस अगोदरच संतप्त झालेल्या भाळवणी गावातील सर्व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी एकत्र येत आरोपी डॉ. मंगेश बेकारसे याला गाठले आणि त्याच्या या कृत्याचा तीव्र निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी लोकभावनांचा आदर न करणाऱ्या या आरोपी डॉक्टरच्या तोंडाला काळे फासून त्याला चपलांचा हार घातला होता. या आक्रमक पवित्र्यामुळे संपूर्ण पारनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉ. मंगेश दत्तात्रय बेकारसे (रा. खारेकर्जुने, ता. जि. अहिल्यानगर) हा वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने भाळवणी (ता. पारनेर) येथे आला आहे. आरोपीने त्याच्या फेसबुक अकाउंटवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक योगदानाविषयी, त्यांच्या लंडन येथील घराविषयी आणि त्यांच्या वकिली व्यवसायाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तसेच, “इतिहास वाचा म्हणजे समजेल, अन् आमचे हिंदू पण मूर्ख आहेत…” अशा प्रकारच्या कमेंट्स करून सामाजिक व धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. दिनांक २१ मे २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर युवक तालुकाध्यक्ष संकेत पटेकर यांनी पारनेर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली.

पारनेर पोलीस ठाण्यात कायदेशीर लढाई पुढे नेण्यासाठी आणि गुन्हा नोंदवून घेण्यासाठी विविध संघटनांचे पदाधिकारी एकत्र आले होते. यामध्ये प्रामुख्याने सामाजिक नेतृत्व राजेंद्र करंदीकर, आरपीआय (RPI) पारनेर तालुका युवक अध्यक्ष प्रदीप नगरे, तसेच गौतम पटेकर, निलेश पटेकर, संभाजी पटेकर, विशाल पटेकर, भागा सोनवणे आणि इतर सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वपक्षीय आंबेडकरवादी कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे प्रशासनाला गुन्हा दाखल करावा लागला.

या तक्रारीवरून पारनेर पोलिसांनी आरोपी डॉ. मंगेश बेकारसे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम २९९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अनिल हरिभाऊ देवकर (बक्कल नंबर ६७५) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी व इतर मित्र संघटनांच्या वतीने या प्रकरणात आक्रमक पाऊल उचलण्यात आले असून, समाजात द्वेष निर्माण करणाऱ्या अशा प्रवृत्तीच्या डॉ. मंगेश बेकारसे याची पोलीस कारवाई सोबतच डॉक्टरी व्यवसायाची सनद (License) कायमची रद्द करण्यात यावी, यासाठी मेडिकल काउन्सिल आणि संबंधित प्रशासनाकडे तीव्र लढा दिला जाईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here