विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार करणार दौरा
चंद्रपूर प्रतिनिधि
प्रबोधिनी न्युज
राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. नुकतेच अवकाळी पावसाने मोठे संकट उभे केले आहे. या भीषण परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना आवश्यक मदत करणे अपेक्षित आहे. परंतु सरकार या परिस्थितीकडे दुर्लक्ष करताना दिसते. त्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार अवकाळी, दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. येत्या दि.2 डिसेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत श्री.विजय वडेट्टीवार अवकाळी, दुष्काळी भागाची प्रत्यक्ष पाहणी करताना शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणार आहेत.
नुकतेच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने मदत दिली पाहिजे. पंचनामे तातडीने केले पाहिजेत. यासाठी शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष पाहणी करून समजून घेणार आहे. त्यानंतर या समस्या सकारसमोर मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा दौरा करणार असल्याचे श्री. वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. दुष्काळामुळे संपूर्ण पिक वाया गेले आहे. या दुष्काळी भागाबरोबरच अवकाळीमुळे भाजीपाला, फळबागा, केळी, पपई,मका, कांदा, सीताफळ, पेरू, मोसंबी, रब्बी ज्वारी, द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा दौरा आहे.
सरकारने दुष्काळ जाहीर करताना केलेल्या गलथानपणामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने पहिल्या टप्प्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. फक्त या 40 तालुक्यांनाच आर्थिक मदत मिळणार आहे. परंतु इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील मदत मिळाली पाहिजे. राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे उरले सुरलेही उध्वस्त केले आहे. शेतकऱ्यांना आधाराची अपेक्षा असताना सरकार आणि मंत्र्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवणे हे संतापजनक आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून आगामी अधिवेशनात सरकारकडे नुसानभरपाईची मागणी करण्यासाठी, शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी हा दौरा करणार असल्याचे श्री. विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.

