खिशात लाख रुपये असलेल्या भिकाऱ्याचा अंत

0
120

२ दिवस निपचित पडून, मृत्यूचं कारण कोड्यात टाकणारं

गांधीनगर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

गांधीनगर: खिशात लाख रुपये असलेल्या भिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुजरातच्या वलसाडमध्ये घडली आहे. भिकाऱ्याचा मृत्यू उपासमारीमुळे झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं. तो दोन दिवसांपासून ग्रंथालयाच्या बाहेर पडला होता. पण कोणीही त्याला रुग्णालयात नेण्याची तसदी घेतली नाही. अखेर त्याची प्राणज्योत मालवली. भिकारी निपचित पडलेला पाहून लोकांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.

भिकाऱ्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी त्याची झडती घेतली. तेव्हा त्यांना त्याच्या खिशात ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटांची बंडलं सापडली. त्याच्या खिशात जवळपास सव्वा लाख रुपये होते. पोलिसांनी भिकाऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यातून भिकाऱ्याच्या मृत्यूचं कारण उलगडलं. उपासमारीमुळे भिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचं समजताच पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला.

मृत भिकाऱ्याचं वय ५० वर्षांच्या आसपास होतं. तो कुठे वास्तव्यास होता याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. भिकारी निपचित पडलेला पाहून स्थानिकानं पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. पण त्याचा जीव वाचू शकला नाही. भिकारी गेल्या काही दिवसांपासून गांधी ग्रंथालयाजवळ पडून होता. काही दिवस त्याची हालचाल जाणवत होती. पण त्यानंतर त्याची हालचाल बंद झाली. त्यानंतर एका स्थानिक दुकानदारानं पोलिसांना फोन केला.
दुकानदाराच्या फोननंतर पोलीस रुग्णवाहिकेसह तिथे पोहोचले. वलसाड रुग्णालयात आपत्कालीन सेवा देणाऱ्या भावेश पटेल आणि त्याची टीम घटनास्थळी पोहोचली. भिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. या दरम्यान भिकाऱ्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्या खिशात मोठ्या प्रमाणात नोटांची बंडलं सापडली. त्यांचं एकूण मूल्य १.१४ लाख रुपयांच्या घरात जातं.
पोलिसांना भिकाऱ्याच्या खिशात ५०० रुपयांच्या ३८, २०० रुपयांच्या ८३, १०० रुपयांच्या ५३७ नोटा सापडल्या. शिवाय २० आणि १० रुपयांच्याही नोटा आढळून आल्या. मृत भिकाऱ्यानं स्वेटर घातलं होतं. त्या स्वेटरच्या खिशात एका प्लास्टिकच्या पिशवीत नोटा ठेवलेल्या होत्या. पोलिसांनी भिकाऱ्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here