
लेखिका
pk मुक्ता आगडे
चंद्रपूर (मूल)
सर्रर्रर्रर्र कन अंगावर काटा आला. नुसता पहिला शब्द लिहिला तरीही . किती वेदनादायक आहे हा शब्द . आता या शब्दांचे समानार्थी शब्द सांगायची गरज तर वाटत नाही . सगळ्यांना माहीतच आहेत हो ना ? वांझ , वांझोटी , पांढऱ्यापायाची , अवदसा, बाँझ , पांढरतोंडी , निपुत्री , पांढरी पाल , बंजर , नापीक, दसा … बापरे बाप ! एका छोट्याश्या गोष्टीचे किती हे नामकरण . नुसता शब्दांचा खेळ हा ,ते आपल्या मराठीत म्हणतात ना की, एक कानाखाली वाजवून दिली तरी त्रास होत नाही पण हे शब्द , मनाला चिरणारे आणि रक्तपात करणारे हेच ते शब्द कधीच कुण्या स्त्री ला सहन होत नाही . अरे बघा ना नीट विचार करून , किती विचित्र शब्द आहेत हे . नुसतं वाचायला तरी कसं कस होत आणि ती स्वतःच्या दुःखात आधीच स्वतःला पूर्ण उधळून बसलेली तिला हा समाज ह्याच्या त्या तलवारीच्या धारीसारख्या असलेल्या शब्दांनी रोज रोज कापून फेकत असतो .
अरेरेरेरेरे , तिला का बोलावलं डोहाळे जेवणात ? तिला का बोलावलं ओटीभरण्याच्या कार्यक्रमात ? तिला का बोलावलं सत्यनारायणाच्या पूजेत ? तिला का बोलावलं मुलाचं नाव ठेवण्याच्या कार्यक्रमात? तिला का मानपान करू देताय ? तिच्या जवळ बाळ का देताय खेळायला ? तिला कस काही वाटत नाही बरं अस आपलं पांढर तोंड घेऊन सुवासींनीच्या , मुलाबाळांच्या समोरून जायला ? बरोबर ना हो , हे असंच ना आपण समाज रोज दररोज तिच्यावर घाव करत असतो ?
किती सहज बोलून जातो ना आपण की ती वांझ आहे . कधी विचार केला का तिच्या मनाचा ? तिला काय वाटत असेल ? तिला किती वेदना होत असतील? तिचा किती मानसिक छळ होत असेल?
आधीच ती तिच्या दुःखात, आणि आपण नाही तिचे दुःखाचे ओझे वाटून घेऊ शकत पण निदान आपल्यामुळे तिच्या पदरात अजून एक दुःख वाढू नये एवढं तर प्रयत्न मात्र नक्कीच करू शकतो ना ? पण नाही , आपल्याला सवय आहे तशी . शेजारी आहोत ना आपण . शेजार धर्म पूर्ण तर करायलाच हवा ना .हो मला माहित आहे सगळेच तसे नसतात मान्य आहे . पण किती जण नसतात ?
स्त्री ने मूल जन्माला घातलाच पाहिजेत का ? अस काही कायदा आहे का ? काही जबरदस्ती आहे का तिच्यावर ? आणि मूल जन्माला घातले म्हणजे ती वांझ नाही असं आहे का ? अरे , अश्या किती तरी स्त्रिया आहेत ज्या आपल्या नवऱ्याचं ही नपुंसकत्व आपल्या पदरात घेतात , लोक इज्जतील घाबरून . आणि मग तेच नवरे रुबाबात मिश्या पिळत समाजात वावरताना दिसतात . यात सर्वात महत्वाच म्हणजे खऱ्या दोषी तर महिलाच असतात असं मला वाटते . आता हे कसं तर ते अस की , का आपल्या मुलीची कूस नाहीच उजवली तर तिची ओळख काय पांढऱ्यापायाची म्हणूनच करून द्याल का ? उत्तर हवाय मला . एखाद्या कूस न उजवलेल्या स्त्रीची ओळख सुद्धा तुम्ही चार चौघात , ” बाई ही अमुक अमुक आहे , आणि बाई व अजून ही एवढे वर्ष झाले लग्न होऊन पण मूल नाही ना बाळ नाही , जन्माचं वांझोट पण लागला बाई हिच्या नशिबाला “. बरोबर ना ? ते ही तिच्याच समोर तिच्याच तोंडावर . ये तिला नको बोलवायला , बारस्यात, तिला नको बोलवायला ओटी भरायला , तिला नको बोलवायला ह्यात , त्यात . खरं आहे ना बायकांनो ? अशी मूल बाळ न झालेली स्त्री जरी रस्त्याने जातांना दिसली तरीही, चार बायकांची खुसपुस लगेच सुरू , अजून नाही झालं बाई ,काय माहीत कुणात कमी आहे तिच्यात की तिच्या नवऱ्यात . फलाण्या दवाखान्यात जातांना दिसली , अस अमुक तमुक विषय … पण खरं सांगायचं तर मला न तिच्यात कमी दिसली ना तिच्या नवऱ्यात . कमी तर तुमच्यात दिसली , तुमच्या विचारात दिसली , एक स्त्री असून दुसऱ्या स्त्री बद्दल हे विचार ही वागणूक ही अवहेलना असेल तर कमी नक्की कोनात आहे ? बहुतांशी वेळा बघा ना , भांडण होतात तेव्हा सुरवात ही इथून आणि शेवट ही याच शब्दाने होतो . कशासाठी हे ? गरजेचं आहे का ? तुमच्या बोलण्याने झालं का मग मुलं ? बाहेरचेच नव्हे तर तिच्या घरातील ही कुणी तिला समजून घेत नाहीत , या वेळी आई , सासू , बहीण अश्या नात्यांची फार गरज असते। पण हे नाते ही या अश्याच विचारांमुळे तुटत गेले आहेत . नुसतं बाळाला जन्माला घालणारीच आई नसते हे विसरलो आहोत आपण .
एक प्रश्न नेहमी पडतो मला , स्त्रियाच वांझोट्या असतात का? उत्तर जर नाही असेल तर मग हे सगळे शब्दांचे चाकू तिच्यासाठीच का ?पुरुषांना काय म्हणत असतील बर अश्या ज्यांच्या मध्ये नपुंसकत्व असत ? वांझोट्या , वांझ्या , पांढरपाया , नापिक्या ?? काय ? काय म्हणतात उत्तर द्या ना ? कसे वाटतात ना शब्दच . “जिभेला हाड नाही तर, काय वाटेल ते बोलणार का “? ” उचलली जीभ आणि लावली टाळ्याला ” अस का करता? स्वतःत दोष असतांना ही उघड होऊ नये यासाठी पुरुष काय काय प्रयत्न करतात हे माहिती आहे का ? तिचा मानसिक छळ , तिला शारीरिक वेदना , आणि अश्या तश्या नाही तर , आपल्यात नपुंसकत्व आहे म्हणून आपल्या बायको इतर पुरुषाकडे कधी बघू नये या भीतीपोटी बिड्या सिगारेटची चटके तिच्या मांड्यांना देतात . तिचे भांगावरील केस कापून तिला कुरूप बनविण्याचा हे असे प्रयत्न पुरुष करतात असतात . का तर स्वतःच नपुंसकत्व लपविण्यासाठी फक्त .
मुलं बाळ नाहीत म्हणून कोण तिच्या तोंडाकडे बघेना , का तर आपल्याला अवदसा लागेल म्हणून ? अवदसा तर आधीच आहे लागली तुमच्या विचारांना . या स्त्रिया बिचाऱ्या तुमच्या ह्या अश्या वागण्याने किती खचून जात असतील कधी विचार केला का ? अरे एक वेळ अशी येते की त्या स्वतः स्वतःला खरोखर पांढऱ्या पायाची , अवदसा समजतात. स्वतः ला अश्या अंधाऱ्या खोलीत डांबून दिवसातील कित्तेक तास आसवांचा सागरात स्वतःला झोकून देतात . आपल्या जगण्याला काहीही एक अर्थ नाही असं समजून किती तरी स्त्रिया स्वतःचे प्राण ही गमावतात . कोण जबाबदार आहे या सगळ्यांना ? हो , हो विचारा ना स्वतःला . कुठं तरी आपण पण जबाबदार आहोत का ? एखाद्या दलित वर्गातील ( सर्वसामान्य शब्दाचा वापर केला आहे ) व्यक्तीला काहीही अपशब्द बोलल्यास कायद्याने गुन्हा आहे . एक कायदा ह्या स्त्रियांसाठी ही असावा असं नाही का वाटत ? तिला जे जे टोचून बोलून कचाकचा तिच्या स्त्रीमनावर वार करतात त्या सगळ्यांना ती ही शिक्षा देऊ शकली पाहिजेत . रोज दिवस रात्र देवाच्या भक्तीत लिन असणाऱ्या स्त्रिया (कुठल्याही धर्माची अवहेलना केलेली नाही ) त्यांना तर एवढं ज्ञान असायलाच हवा ना , की कुणाचं मन दुखावून , कुणाला टोचून बोलून , कुणाची निंदा करून देव खुश होत नसतो . ते म्हणतात ना , ” निंदकाचे घर असावे शेजारी ” . अगदी उत्तम फिट बसते बघा ही म्हण .
तिला नाही का वाटत आई बनावं ? तिला नाही का वाटतं तिची कूस भरावी ? तिला नाही का वाटत तिचा ही पान्हा फुटावा ? तिला नाही का वाटत कुणी चुमुकल्या पावलांनी तीच अंगण फुलवाव ? तिला नाही का वाटत तिचा मायेचा झरा घडाघडा फुटावा ? तिला नाही का वाटत इवलेशे हातांनी कोणी तीच बोट धरून चालावं ? तिला नाही का वाटत कुणी तिला बोबड्या बोलांनी “आई आई” हाक द्यावी ?
नक्की वांझ कोण ? ती की समाज , आपण ? वांझ तर आपण आहोत . आपल्या विचारांना वांझोटे पणा लागलाय . बुरशी लागलीय आणि धुळ माखलय माणुसकीवर . माणुसकी संपली आहे, आणि तमाशा लावलाय तिच्या भावनांचा . तिच्या आत्मसन्मानाचा हा वांझोटा खेळ मांडला आहे. ती वांझ नाहीच. बाळाला जन्म दिली नाही पण असं कुणाच्या भावनेशी खेळली नाही . बिना मूल जन्माला घालता ही तिच्यात अथांग प्रेमाचा झरा साठलेला आहे जो कधी तुम्ही वाहूच दिला नाही. वांझोटे तुम्ही आम्ही आहोत.














