
जागतिक वसुंधरा दिन ज्याला जागतिक पृथ्वी दिनही म्हटले जाते. हा दिवस पृथ्वीवरील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करण्याकरिता आणि कृती करण्यास प्रेरणा देण्याकरिता समर्पित एक जागतिक कार्यक्रम आहे. वसुंधरा दिन दरवर्षी 22 एप्रिलला साजरा केला जातो. हा दिवस हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड आणि जैवविविधततेचा ऱ्हास यासारख्या पर्यावरणीय समस्यावर लक्ष केंद्रित करतो, आणि लोकांना, समुदायांना व सरकारला कृती करण्यासाठी प्रोत्साहित करतो.
वसुंधरा दिनाची सुरुवात 1970 मध्ये अमेरिकेत झाली. मोठ्या प्रदूषण घटनेनंतर पर्यावरणीय समस्यावर प्रकाश टाकण्यासाठी अमेरिकेचे सिनेटर गेलॉर्ड नेल्सन यांनी याची प्रामुख्याने सुरुवात केली. पहिल्या वसुंधरा दिनात लाखो अमेरिकन लोकांनी सहभाग घेतला आणि
कालांतराने ही एक जागतिक चळवळ बनली.
जागतिक वसुंधरा दिनाची संकल्पना चालू 2026 वर्षात “आमची शक्ती आमचा ग्रह आहे” ही संकल्पना अक्षय ऊर्जा स्त्रोताकडे वळून एक शाश्वत भविष्य घडवण्यासाठी जनतेची, संस्थेची आणि सरकारची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करते. यामध्ये भूऔष्णिक, जलविद्युत, भरती ओहोटी, पवन आणि सौर उर्जा अशा स्त्रोतावर भर देते.
वाढती लोकसंख्या आणि जागतिक तापमानामुळे हवामानात बदल होत आहे. समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. ज्यामुळे नैसर्गिक आपत्ती मानवजातीसाठी अधिकाधिक धोकादायक बनत आहे. मानव जातीला दरवर्षी हजारो लोकांचा बळी घेणाऱ्या असंख्य आपत्तीचा सामना करावा लागत आहे.
पृथ्वीला नैसर्गिक आपत्तीपासून वाचवणे आणि मानवाला राहण्यासाठी व टिकून ठेवण्यासाठी एक चांगले स्थान उपलब्ध करुन देणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. जागतिक वसुंधरा दिन हा स्थानिक पर्यावरण प्राधिकरणाद्वारे नवीन धोरणे तयार करण्याचे, पर्यावरणीय समस्यावर कृती करते.
जागतिक वसुंधरा दिन हा केवळ दिनविशेष नसून पृथ्वीवरील जीवनाच्या अस्तित्वाशी निगडित असलेली एक गंभीर जाणीव आहे. मानवाने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अभूतपूर्व विकास साधला असला तरी या विकासाच्या बदल्यात पृथ्वीच्या संसाधनांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड, जैवविविधतेचा ऱ्हास, जलसंकट यांसारख्या समस्यांनी आज संपूर्ण जगाला वेढले आहे. अशा परिस्थितीत वसुंधरा दिन हा केवळ उत्सव म्हणून नव्हे, तर आत्मपरीक्षणाचा दिवस म्हणून पाहणे आवश्यक आहे. पृथ्वी ही आपली केवळ राहण्याची जागा नसून ती आपली ‘आई’ आहे, जी आपल्याला अन्न, पाणी, हवा आणि जीवन देत असते. त्यामुळे तिच्या रक्षणाची जबाबदारी ही प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे.
*जागतिक वसुंधरा दिनाचे महत्व*
जागतिक वसुंधरा दिन आपल्याला आठवण करुन देतो की मानवी कृतीमुळे पर्यावरणावर ताण येत आहे. भविष्यातील पिढ्यासाठी शाश्वत जीवनशैली आवश्यक आहे. सामूहिक कृतीतून खरा बदल घडू शकतो. आज 190 हून अधिक देश यात संपन्न होत आहे. ज्यामुळे हा जगातील सर्वात मोठ्या उत्सवापैकी एक बनला आहे. जागतिक वसुंधरा दिन झाडे लावणे, समुद्रकिनारे, नद्या आणि परिसराची स्वच्छता करणे, पुनर्वापराला प्रोत्साहन देणे आणि प्लास्टिकचा वापर कमी करणे, शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करणे. नूतनीकरणक्षम ऊर्जा उपक्रमांना पाठिंबा देणे.
जागतिक वसुंधरा दिन हा आपल्या ग्रहाचा उत्सव आणि त्याचे संरक्षण करण्याच्या आपल्या जबाबदारीची आठवण करुन देणारा दिवस आहे. पाणी वाचवणे, कचरा कमी करणे किंवा झाडे लावणे यासारख्या छोट्या कृतीदेखील पृथ्वीला अधिक निरोगी बनवण्यासाठी योगदान देऊ शकतात.
आजच्या घडीला पर्यावरणीय संकटाचे स्वरूप अत्यंत भीषण झाले आहे. औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या यामुळे नैसर्गिक संसाधनांचा अतिरेकाने वापर होत आहे. वृक्षतोड, नद्या, तलाव आणि समुद्र प्रदूषणाने ग्रासले आहे. हवेत विषारी वायूंचे प्रमाण वाढले आहे. या सर्व घटकांमुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे, या तापमानवाढीमुळे हिमनद्या वितळत आहेत, समुद्राची पातळी वाढत आहे, नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे मानवी जीवनच धोक्यात आले आहे.
पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे मानवी हस्तक्षेप हे प्रमुख कारण आहे. ‘विकासाच्या नावाखाली आपण नितीचा विनाश करत आहोत मोठमोठे प्रकल्प, धरणे, रस्ते, कारखाने यासाठी जंगलांची वृक्षतोड केली जाते. नद्या वळविल्या जातात. वैनगंगा नदीतील गोसेखुर्द प्रकल्पातील पाणी नद्याजोड प्रकल्पाद्वारे जोडण्यात येणार आहे. निसर्गाच्या या असंतुलनाचा परिणाम मानवी मनावर होतो.
शाश्वत विकास म्हणजे असा विकास, जो वर्तमान पिढीच्या गरजा पूर्ण करताना भविष्यातील पिढ्यांच्या गरजांवर परिणाम करत नाही. म्हणजेच, नैसर्गिक संसाधनांचा वापर करताना त्यांचे संवर्धन आणि पुनर्निर्मिती यांचा विचार करणे आवश्यक आहे. ऊर्जा, पाणी, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर, नवीकरणीय ऊर्जेचा अवलंब, कचऱ्याचे पुनर्वापर यांसारख्या उपाययोजना यासाठी महत्त्वाच्या आहेत.
मानवी क्रियांमुळे जैवविविधतेचा -हास होत आहे. अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे पर्यावरणीय संतुलन बिघडत आहे. त्यामुळे जैवविविधतेचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी जंगलांचे संवर्धन, वन्यजीव संरक्षण, नैसर्गिक अधिवासांचे जतन यावर भर देणे गरजेचे आहे.
जलसंकट ही आणखी एक गंभीर समस्या आहे. पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक आहे. परंतु आज अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. भूजलाचा अतिरेकाने वापर, पावसाच्या पाण्याचा अपुरा साठवण, नद्यांचे प्रदूषण यामुळे जलस्रोत आटत आहेत.
त्यामुळे पाण्याचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाचे पाणी साठवणे, पाण्याचा योग्य वापर, जलप्रदूषण रोखणे यांसारख्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
कचरा व्यवस्थापन हा देखील पर्यावरण संवर्धनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्लास्टिकचा वाढता वापर हा पर्यावरणासाठी मोठा धोका ठरला आहे. प्लास्टिक विघटनास खूप वेळ लागतो, त्यामुळे ते जमिनीवर, पाण्यात साचून राहते आणि प्रदूषण वाढवते. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करणे, पुनर्वापर करणे आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करणे आवश्यक आहे. ‘कमी करा, पुनर्वापर करा आणि पुनर्चक्रण करा’ हा मंत्र अंगीकारणे गरजेचे आहे.
पर्यावरण संवर्धनात शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी शिक्षण प्रणालीत पर्यावरण शिक्षणाचा समावेश करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. तसेच समाजातील प्रत्येक घटकाने पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे.
वसुंधरा दिनाच्या निमित्ताने आपण प्रत्येकाने काही ठोस संकल्प करणे आवश्यक आहे. झाडे लावणे, पाणी वाचवणे, कचरा कमी करणे, पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे यांसारख्या लहान उपाययोजना देखील मोठा फरक घडवू शकतात. पर्यावरण संवर्धन ही केवळ जबाबदारी नसून ती आपल्या अस्तित्वाची गरज आहे.
वसुंधरा दिन हा आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो की, पृथ्वी ही आपली मालमत्ता नसून आपण तिचे केवळ पालक आहोत. जमीन ही आपल्याला वापरासाठी भाड्याने दिली आहे. पुढील पिढ्यांसाठी ही पृथ्वी सुरक्षित आणि समृद्ध ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. जर आपण आज योग्य पावले उचलली नाहीत, तर भविष्यातील पिढ्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.
पृथ्वीला नैसर्गिक आपत्तीपासून वाचवणे आणि तिला राहण्यासाठी व टिकून ठेवण्यासाठी एक चांगले स्थान उपलब्ध करुन देणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. जागतिक वसुंधरा दिन हा स्थानिक पर्यावरण प्राधिकरणाद्वारे नवीन धोरणे तयार करण्याचे, पर्यावरणीय समस्यावर कृती करते.
प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण















