prabodhini news logo
Home कल्याण प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – बुद्ध पौर्णिमा

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – बुद्ध पौर्णिमा

0
78

भगवान बुद्धांचा जन्म इ. स. पूर्व 563 च्या सुमारास सध्याच्या नेपाळमधील लुंबिनी वनात वैशाख पौर्णिमेला राजकुमार सिद्धार्थ म्हणून झाला. मुलाचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. जो आपल्या ध्येयात सिद्धी प्राप्त करतो तो सिद्धार्थ. त्याकाळात चातुर्वर्ण्य होते. विषमता होती. अंधश्रद्धा होती. अशा काळात भगवान बुद्धांनी समाजाला मानवतेचा मार्ग दाखवला. राजवैभव, सुखसंपत्ती, ऐश्वर्य, यांचा उपभोग असूनही त्यांचा मनात सतत प्रश्न निर्माण होत होता, तो म्हणजे मानवाच्या दुःखाचे कारण.
लहानपणापासूनच, आपल्या सभोतालच्या लोकांचे दुःख पाहून ते व्यथित झाले. सत्याच्या शोधात त्यांनी आपल्या राजेशाही जीवनाचा त्याग केला आणि अनेक वर्षे ध्यान आणि आध्यात्मिक साधनेत घालविली. अखेरीस बोधगया येथील बोधी वृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ते बुद्ध झाले. ज्याचा अर्थ ‘जागृत व्यक्ती’ असा आहे. त्यांच्या शिकवणीमध्ये सत्य, अहिंसा, करूणा आणि दुःखाचा अंत करण्याच्या मार्गाच्या महत्त्वावर भर दिला होता.
बुद्धांची मूळ शिकवण चार आर्यसत्यावर आधारित आहे. दुःख निवारण्याचा मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला आहे. ही शिकवण लोकांना नैतिक जीवन जगण्यासाठी, ज्ञान विकसित करण्यासाठी आणि मानसिक शिस्त पाळण्यासाठी, मनाला शिस्त लावण्यासाठी मार्गदर्शन करते. बुद्धांच्या शिकवणीत बुद्ध म्हणतात इच्छा हे दुःखाचे मूळ कारण आहे. इच्छावर नियत्रंण ठेवून शांती आणि आनंद प्राप्त करता येते.
संसारातील सुख क्षणभंगुर आहे, जीवन दुखमय आहे, त्यावर उपाय शोधला पाहिजे. ही जाणीव त्यांना झाली. यानंतर सिद्धार्थांनी अनेक वर्षे कठोर तपश्चर्या करून, ध्यान चिंतन, आत्मशोध घेऊन बोधगया येथे पिंपळवृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, त्या दिवासापासून ते बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले, पिंपळवृक्ष बोधिवृक्ष म्हणून प्रसिद्ध झाला.
भगवान बुद्धांनी जातीभेदाला तीव्र विरोध केला. त्यांनी सांगितले की “मनुष्य जन्माने मोठा होत नाही तर कर्माने मोठा होतो” त्यांच्या विचारात समता, बंधुता, मानवता होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांच्या विचारांना लोकशाहीचे अधिष्ठान मानले.
तथागत गौतम बुद्धाच्या जीवनात वैशाखी पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच पौर्णिमेला बुद्धाच्या जीवनात अनेक अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्या, त्या म्हणजे, राजपुत्र सिद्धार्थ गौतमाचा जन्म, राजकन्या यशोधरेचा जन्म, राजकुमार सिद्धार्थाचा मंगलपरिणय (विवाह), ज्ञानप्राप्ती, आणि महापरिनिर्वाण.
बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध जगतातील सर्वात पवित्र दिवस आहे. हा बौद्ध धम्मातील सर्वात महत्वाचा सण आहे आणि हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बौद्धांनी प्रत्येक पौर्णिमेला पवित्र मानले असले तरी वैशाख महिन्याच्या चंद्राला विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी बुद्धाच्या जिवनात अनेक घटनांपैकी मुख्य तीन घटना घडल्या त्या म्हणजे जन्म, ज्ञानप्राप्ती, आणि महापरिनिर्वाण.
गृहत्यागा नंतर सिद्धार्थ गौतमाने सहा वर्ष वनात कठोर तपश्चर्या केली. जगातील दु:ख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुध्दांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वत:चे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. सिध्दार्थ गौतम उरुवेला सोडून गयेला आले. तेथे पिंपळ्वृक्षाखाली ध्यानस्थ बसले. ज्ञान प्राप्‍तीसाठी चार आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. चवथ्या आठवडयाच्या शेवटच्या दिवशी, वैशाख पोर्णिमेच्या रात्री बोधिवृक्षाखाली दु:खाच्या विषयावर ध्यान करीत असता त्यांचा नविन मार्ग प्रकाशित झाला. त्यांना स्पष्टपणे दिसून आले की, जगात दोन समस्या आहेत. जगामध्ये दु:ख आहे, ही पहिली समस्या; आणि हे दु:ख कसे नाहिसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे, ही दुसरी समस्या. याप्रमाणे शेवटी, चार आठवडे चिंतन केल्यावर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला. अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले. त्यांना एक नवा मार्ग दिसला.
वैशाख शुध्द पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि दु:खाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. सिध्दार्थ गौतमाला 35 व्या वर्षी बुध्दत्व प्राप्‍त झाले. त्यानंतर पंचेचाळीस वर्षे भगवान बुध्दांनी दु:ख आणि दु:खमुक्‍तीचा मार्ग याचीच शिकवण दिली.
*बुद्धाचा अनित्यता वादाचा अर्थ,”जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही. परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे*”
बुद्ध पौर्णिमा हा जगभरातील बौद्धांद्वारे साजरा केला जाणारा एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. हा सण बौद्ध धम्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्धांचा जन्म दिवस, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण यांचे प्रतीक आहे. हा शुभ दिवस वैशाख महिन्यातील पौर्णिमेला येतो. जी साधारणपणे एप्रिल मे महिन्यात येते. सन 2026 ची वैशाख पौर्णिमा 1 मे ला आली. 1 मे ला जागतिक कामगार दिवस आणि महाराष्ट्र दिवसही असतो.
आज देशात बुद्ध पौर्णिमा मोठ्या श्रद्धाभावाने आणि साधेपणाने साजरी केली जाते. अनुयायी विहारांना भेटी देतात. बुद्धाला फुले अर्पण करतात, दीप प्रज्वलन करतात, त्रिशरण, पंचशिल, वंदना, पूजापाठ म्हणतात. अनेक ठिकाणी धम्मग्रंथाचे वाचन करतात. ध्यान करतात. गरजूंना मदत करतात, अन्नदान करतात, खीरीचे वाटप करतात, काही लोक शरबत वाटप करतात, काही लोक मिठाईचे वाटप करतात, काही लोक रॅली काढतात, भाषणे, गीत गायन केले जाते, एक दुसऱ्यांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा दिल्या जातात. ही सर्व कृत्ये उत्सवाचा भाग आहे. बोधगया आणि सारनाथ सारख्या ठिकाणी विशेष मेळावे, सामुदायिक वंदन घेतल्या जाते. हा सण केवळ बौद्धांसाठीच महत्वाचा नाही तर तो संपूर्ण मानवजातीसाठी एक वैश्विक संदेश आहे. तो आपल्याला शांती, सलोखा, आणि करूणा शिकवतो. आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनात बुध्दाची शिकवण आपल्याला शांत राहण्याची, सकारात्मक विचार करण्याची इतरांशी मैत्रीने वागण्याची आठवण करून देतो.
बुद्ध पौर्णिमा हा आध्यात्मिक चिंतन आणि नैतिक उन्नतीचा दिवस आहे. हा दिवस भगवान बुद्धांनी दाखविलेल्या धम्म आणि आंतरिक शांतीच्या मार्गाचे
अनुसरण करण्यास प्रेरित करतो. आपल्या दैनंदिन जीवनात त्यांच्या शिकवणीचे पालन करून, आपण अधिक शांततापूर्ण आणि सुसंवादी जगासाठी योगदान देऊ शकतो. कुशल कर्म करा, अकुशल कर्म टाळा, मन शुद्ध करा.
बुध्दांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. विषमतेविरुद्ध त्यांचे आंदोलन होते. परंतु ती लढाई हिंसेची नव्हती तर विचारांची होती. त्यांनी सांगितले “अत्त दीप भव” स्वतःचा दीपक स्वतः बना, हा त्यांचा संदेश आजही प्रत्येकाला आत्मविश्वास आणि स्वावलंबन शिकवतो.
गुणवंत व्हा. अहंकार सोडा. आपल्यामुळे कुणाच्याही चेहऱ्यावर हसू येवू द्या. सकारात्मक रहा. आयुष्य सुंदर आहे, आनंदात जगा, स्वतःची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या.
*आपले सर्व संकल्प पौर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे पूर्ण होवो*.
*शारिरीक व मानसिक निरोगी आरोग्य संपदा लाभो*.
*सम्यक सम्बुध्द करुणाचे महासागर तथागत गौतम बुध्द यांच्या जयंती व बुद्ध पौर्णिमे निमित्त कोटी कोटी प्रणाम

प्रा. डॉ. हंसराज रंगारी
कल्याण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here