लेख- ऑनलाईन शिक्षण…पुन्हा नको…

0
112

आपल्या सर्वांनाच माहित आहे की २०१९ या वर्षात कोविड-१९ ने थैमान घातले होते. त्यानंतरचे २०२० वर्ष तर खूपच त्रासदायक ठरले होते.या वर्षात अनेक जण आपल्या प्रियजनांना हरवून बसले.या काळात आपल्या आयुष्यात खूप मोठे बदल घडून गेले.अनेकजण मानसिक आजारांनी ग्रस्त झाले होते.त्यातच भर पडली ती ऑनलाईन शिक्षणाची.कोविडसारख्या भयंकर आजारामुळे शाळा,काॅलेजेस ऑफलाईन न राहता ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याची भूमिका शासनाने घेतली होती.विद्यार्थी आणि शिक्षकांवर यामुळे थोडा दबाव वाढला होता.विद्यार्थ्यांना आजपर्यंत ऑफलाईन पध्दतीने शिकण्याची सवय होती.ऑनलाईन शिक्षण यापूर्वी न घेतलेले शिक्षक आणि विद्यार्थी जरा संभ्रमात होते.ऑफलाईन शिक्षण पद्धतीत कुणाला किती, काय समजले ते कळते.ऑनलाईनमध्ये याचा अंदाज येत नाही.ऑफलाईन क्लासमध्ये मुलांना एखादा टाॅपिक परत समजावून सांगणे सोपे असते.तोच टाॅपिक वेगळ्या पद्धतीने सुध्दा मुलांना समजावून सांगता येतो.कधी उदाहरणे देऊन देखील समजवता येतो.मात्र कॅमे-यासमोर शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवतात तेव्हा विद्यार्थ्यांशी जो संवाद व्हायला हवा तो होत नाही.आणखी एक बाब म्हणजे ऑनलाईन शिक्षणामध्ये सतत मोबाईलचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर देखील दुष्परिणाम होतो.त्यांच्या डोळ्यांना स्क्रीन कडे सतत बघितल्यामुळे त्रास होतो.काहींचे डोळे लाल होतात.
ऑफलाईन शिक्षण माझ्यामते उत्कृष्ट आहे.त्याचे कारण असे की शाळेमध्ये, काॅलेजमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे मित्रमंडळी भेटतात.त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते.नवनवीन गोष्टींची माहिती मिळते.मुलांची सामाजिक कौशल्ये, नेतृत्व गुण वाढीस लागतात.मुलांची वैचारिक, बौद्धिक पातळी वाढण्यास नक्कीच मदत होते.ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना या गोष्टीला मुकावे लागते.शाळा,काॅलेजसाठी घराबाहेर पडल्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो.हल्ली शहरात बहुतेक सर्व विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन असतोच.पण खेडेगावात शिकणा-या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन असेलच असे नाही.ऑनलाईन शिक्षणात ही असमानता मुख्यतः दिसून येते.विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत असताना उपस्थित आहेत आणि लक्ष देऊन लेक्चर ऐकत आहेत याची खात्री नसते. झूमसारख्या प्लॅटफॉर्मवर एखादा विद्यार्थी लाॅगिन झाला तरी तो पूर्णवेळ लेक्चर अटेंड करतो आहे याची खात्री देता येत नाही.परीक्षेच्या काळात ऑनलाईन परीक्षेमध्ये विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे पाहून लिहू शकतात.ऑनलाईन परीक्षेच्या वेळी प्रत्येक विद्यार्थ्याकडे शिक्षक लक्ष पुरवू शकत नाही.असे ऑफलाईन शिक्षणात घडण्याचे प्रमाण कमी आहे.शिक्षकांचे सर्व प्रशिक्षण हे वर्गात शिकवण्याच्या दृष्टीने झाले असते.वर्गात शिकवण्याच्या अनुभव त्यांच्याकडे असताना कोविडच्या काळात ऑनलाईन अध्यापन करावे लागणे हा त्यांच्यासाठीही मोठा बदल होता.कोणत्याही व्यक्तीच्या जडणघडणीत तो जिथे शिकतो तिथल्या वातावरणाचा,संगतीचा आणि त्याच्यातील स्किल्सचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो. ऑनलाईन शिक्षण पध्दतीत विद्यार्थी आपल्या समवयस्क मुलांमध्ये एकत्र राहू शकत नाही. एकमेकांशी मैत्री करणे, मैदानावर एकत्र खेळणे, दंगामस्ती करणे या गोष्टींचा अभाव ऎनलाईन शिक्षणात असतो.ऑफलाईन शिक्षणात विद्यार्थी सामाजिक वर्तनाचे नियम, सामाजिक शिस्त आपोआपच शिकतात, जे ऑनलाईन शिक्षणात घडत नाही. काही उपक्रम असे असतात जे शिक्षकांच्या देखरेखीखालीच करावे लागतात.जसे प्रयोगशाळेत प्रयोग करणे. याकरता ऑनलाईन माध्यमातून शिक्षण देणे कठीण आहे. ऑनलाईनमध्ये बरेचदा कनेक्टिव्हिटी नसते.त्यामुळे साहाजिकच शिक्षणात अडथळा निर्माण होतो.ऑनलाईन शिक्षणाच्या काही मर्यादांमुळे शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणाला तो पर्याय ठरू शकत नाही.प्रत्यक्ष शाळेत शिकण्याची आणि शिकवण्याची पद्धत सारखी असूच शकत नाही. शिवाय ऑनलाईन शिक्षण शिकविताना शिक्षकांना खूप मेहनत घ्यावी लागते. नेहमीच्या प्रत्यक्ष वर्गात शिकवण्यापेक्षा या तयारीसाठी जास्त वेळ द्यावा लागतो. विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांचे शंका निरसन करण्यास किंवा त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी, अधूनमधून त्यांच्याशी संवाद साधणे फार महत्त्वाचे आहे जे फक्त ऑफलाईन शिक्षण पध्दतीनेच होऊ शकते.

लेखिका – लैलेशा भुरे
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here