सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज – ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळावा यासाठी ठाणे जिल्ह्यातील महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी अनेक महिलांचे अर्ज हे पात्र ठरले असून त्यांच्या खात्यात आता पैसेही येऊ लागले आहेत.
या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार लिंक बँक खात्यात दर महिन्याला १,५०० रुपये जमा केले जातील. यासाठी संबंधित महिलेचे बँक खाते आधारशी लिंक करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
सरकारने महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ३००० रुपये जमा करण्यास सुरुवात केली असून “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेसाठी अर्ज करताना लाभाची रक्कम थेट (DBT द्वारे) अर्जात नमूद केलेल्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या बँक खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे महिलांनी त्यांची बँक खाती आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. बँक खात्याचे ई-केवायसी करणे देखील आवश्यक आहे. जवळच्या सेतू केंद्रावर ई-केवायसी करता येते. मात्र, बँक खाते आधार संलग्न करण्याची प्रक्रिया संबंधित बँकेला भेट देऊन करून घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद मार्फत करण्यात येत आहे.

