prabodhini news logo
Home चंद्रपूर सिंदेवाही येथे इमारतीसाठी जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप

सिंदेवाही येथे इमारतीसाठी जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप

0
126

दोन दिवसांत इमारतीसाठी निधी मंजूर न केल्यास सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करणार – मिथुन मेश्राम

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदेवाही क्र. १ या शाळेची इमारत पूर्णतः जीर्ण झाली असून त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मागील अनेक दिवसापासून शासन – प्रशासनाकडे इमारत बांधकाम साठी निधीची मागणी करीत असताना कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या मागणी कडे लक्ष दिले नाही. अखेर शाळा व्यवस्थापन समितीने शाळेलाच कुलूप ठोकले असून येत्या दोन दिवसांत कोणताही निर्णय झाला नाही. तर आंदोलन अधिक तीव्र करून एकनाथ शिंदे सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करणार असल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली आहे.
सिंदेवाही येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ येथे १ ते ४ वर्ग असून सामान्य नागरिकांचे चिमुकले या शाळेत शिक्षण घेत आहेत. या शाळेच्या इमारतीचे बांधकाम सन १८९५ ची असुन आज १२९ वर्ष पूर्ण झालेत. परंतु आजपर्यंत या ईमारतीला कोणतीही डागडुजी सुध्दा केली गेली नाही. शाळेची इमारत १२९ वर्षापूर्वीची असल्याने वर्गखोल्याची छत गळती, तडा गेलेली भिंती अशा धोकादायक इमारतीमध्ये विदयार्थ्यांना शिक्षण घावे लागत आहे. धोकादायक वर्गखोल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षते विषयी प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे धोकादायक इमारत निर्लेखीत करुन जि.प.प्राथमिक शाळा सिंदेवाही क्र. १ येथे सर्व सुविधायुक्त सुसज्ज इमारत बांधकाम करण्यास भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात यावे . याकरिता मागील अनेक दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन , शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार , राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते तथा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), सिंदेवाहीचे गटविकास अधिकारी , गटशिक्षणाधिकारी या सर्वांकडे पत्र व्यवहार करण्यात आला. परंतु अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने शाळा व्यवस्थापन समितीने शाळा बंद आंदोलनाबाबत दोनदा पत्र व्यवहार केला. मात्र शासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याने अखेर शाळा व्यवस्थापन समितीने शाळेला कुलूप ठोकून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नाईलाजास्तव बेमुदत शाळा बंद आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे. तसेच येत्या दोन दिवसांत शासन – प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही. तर शिंदे सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी दिली.
या प्रसंगी उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष मिथुन मेश्राम, उपाध्यक्ष अमोल कुचनवार व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

बॉक्स;- सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत प्रशासनाला शाळेच्या इमारतीचे निर्लेखन संदर्भात सन २०२२ मध्ये पत्र व्यवहार करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी नगरपंचायत प्रशासनाने शाळा आमच्या अधिकारात येत नसल्याने आम्ही शाळा निर्लिखीत करू शकत नाही असे पत्र या वर्षी दिले आहे. अशा प्रकारचे पत्र देण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाला दोन वर्षे लागली हे विशेष बाब आहे. त्यानंतर पंचायत समिती सिंदेवाही प्रशासनाने वेळ काढूपणा करत आजपर्यंत शाळा इमारत निर्लेखन केलेले नसुन विद्यार्थ्यांच्या जिवितास धोका होऊ शकतो – अमोल कुचनवार उपाध्यक्ष, शा.व्य. समिती सिंदेवाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here