दिव्यांग बहिणींनी आमदार किशोर जोरगेवार यांना बांधला राखीचा रेशीम धागा
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – रक्षाबंधन हा आपल्या भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे, जो केवळ बंधुत्वाच्या नात्याला साजरा करत नाही, तर प्रेम, विश्वास, आणि संरक्षणाची भावना जागृत करतो. आज दिव्यांग बहिणींनी मला राखी बांधली. दिव्यांग भगिनींच्या संरक्षणाचे आमचे कर्तव्य आहे. त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत. आजचा हा कार्यक्रम म्हणजे बंधुत्वाच्या धाग्यात दिव्यांग भगिनींचा सन्मान असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी शेकडो दिव्यांग बहिणींनी एकत्र येत आमदार किशोर जोरगेवार यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. या प्रसंगी भावना व्यक्त करताना ते बोलत होते.
“भगिनीला सन्मानाने वागवावे, तिच्या हक्कांचे रक्षण करावे, आणि तिच्या विकासासाठी आपले योगदान द्यावे, हे आपले कर्तव्य आहे. दिव्यांग महिलांच्या संघर्षाची कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायक आहे. त्यांना जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करावी लागते, परंतु त्यांनी आपल्या मनाची आणि शरीराची ताकद दाखवून आपल्या ध्येयांच्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल केली आहे. त्यांचे साहस, आत्मविश्वास, आणि अडचणींवर मात करण्याची इच्छाशक्ती ही उर्जा देणारी आहे. आपण एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, एकमेकांचे रक्षण केले पाहिजे, आणि एकमेकांप्रती प्रेम, आदर, आणि समर्पणाची भावना ठेवली पाहिजे,” हे आजचा सण आपल्याला आठवण करून देतो. यातून आपण त्यांच्यासाठी एक सुरक्षित, समर्थ, आणि स्नेहपूर्ण वातावरण निर्माण करणे गरजेचे असल्याचे या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांना राखी बांधण्यासाठी शेकडो दिव्यांग महिला राजमाता निवासस्थानी एकत्र आल्या होत्या. या प्रसंगी या बहिणींनी आपल्या लाडक्या भावाचे औक्षण करून त्यांना राखीचा पवित्र धागा बांधला. आमदार किशोर जोरगेवार यांनीही भेटवस्तू देत आपल्या बहिणींचा आशीर्वाद घेतला.
योगा ग्रुपच्या सदस्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना बांधली राखी
जिव्हाळा परिवर्तन योगा फाउंडेशन ग्रुपच्या वतीने सकाळी सहा वाजता राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज समोरील बागेत रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना राखी बांधली तर तुकूम येथील हनुमान मंदिर आणि स्वामी समर्थ महिला मंडळ योगा ग्रुपच्या वतीनेही कार्यक्रम आयोजित करून आमदार किशोर जोरगेवार यांना राखीचा धागा बांधला. यावेळी शेकडो महिलांची उपस्थिती होती.

