प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – अनुसूचित जाती नव बौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना (विशेष घटक योजना) जिल्हा परिषद,ठाणे मार्फत राबविण्यात येत आहे या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.
अनुसूचित जाती नव बौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने कृषि विभाग, जिल्हा परिषद, ठाणे मार्फत जिल्ह्यामध्ये सन २०२४-२५ करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना राबविण्यात येत आहे.
नवीन विहीर २ लाख ५० हजार रकम्म रु., जुनी विहीर दुरुस्ती ५० हजार रकम्म रु. , इनवेल बोअरिंग २० हजार रकम्म रु., पंपसंच २० हजार रकम्म रु., विज जोडणी आकार १० हजार रकम्म रु., शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण १ लाख रकम्म रु., व सूक्ष्म सिंचन संच अ) ठिबक संच – ५० हजार ब) तुषार संच – २५ हजार या सात बाबींचा लाभ या योजनेअंतर्गत नवीन विहीर पॅकेज (रक्कम रू. ३.३० लाख पर्यंत) असेल. जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज (रक्कम रु.१.३० लाख पर्यंत) व शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण पॅकेज (रक्कम रु. १.८० लाख पर्यंत) पॅकेज स्वरूपात देण्यात येईल.
या योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन संचाकरिता मंजूर मापदंडानुसार येणाऱ्या खर्चापैकी कमाल ५५% अनुदान प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- प्रती थेंब अधिक पीक या योजनेतून देण्यात येईल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तरतूदीतून १०% पूरक अनुदान असे एकूण ९०% टक्के अनुदान देण्यात येईल.
योजनेचा लाभ घेण्याकरिता निकष व आवश्यक कागदपत्रे
१) लाभार्थी अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकरी असला पाहिजे.
२) शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकार्याने दिलेले जात प्रमाणपत्र आवश्यक
३) ज्या शेतकऱ्यांना नवीन विहिर या घटकाचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांना किमान ०.४० हेक्टर शेतजमीन आवश्यक
४) सामूहिक शेत जमीन किमान ०.४० हेक्टर धारण करणारे एकत्रित कुटुंब नवीन विहीर घटकाचा लाभ घेण्यास पात्र असेल.
५) नवीन विहिरी व्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घेण्याकरिता किमान ०.२० हेक्टर शेतजमीन आवश्यक
६) या योजनेअंतर्गत कमाल शेत जमिनीची अट ६ हेक्टर आहे.
७)शेतकऱ्याच्या नावे जमीन धारणेचा ७/१२ दाखला व ८ अ उतारा असणे आवश्यक आहे.
८)लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
९)लाभार्थ्याची बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
१०) शेतकऱ्याचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न १,५०,००० लाख पेक्षा जास्त नसावे.
११) लाभार्थी योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी ग्रामसभेची शिफारस आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. ऑनलाइन पद्धतीने केलेला अर्ज व प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह कृषी अधिकारी (विशेष घटक योजना) पंचायत समिती यांच्याकडे सादर करावा. अधिक माहितीसाठी कृषी अधिकारी (विशेष घटक योजना) पंचायत समिती तसेच जिल्हा कृषी अधिकारी ( विशेष घटक योजना), जिल्हा परिषद, ठाणे यांच्याशी संपर्क साधावा.

