
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
पुसद प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – पुसद.(जि.यवतमाळ) : देशात विविध समाजाचे आरक्षणासाठी आंदोलने सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात जातनिहाय जनगणनेची मागणी सर्वच स्तरातून होत आहे. त्याला अनुसरून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने 30 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. पुसद येथेही कम्युनिस्ट पक्ष व पक्षाशी संलग्नित आयटक संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी पुसद यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. तसेच राज्यात काही ठिकाणी जनतेचा विरोध असतानाही प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे ती त्वरित थांबविण्यात येण्याची मागणी सुध्दा या निवेदनात केली आहे. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे या प्रमुख मागणी सह नवीन शैक्षणिक धोरण रद्द करणे, 50 % आरक्षणाची अट रद्द करणे, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी किमान आधारभूत किमतीचा कायदा करा, सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण त्वरित थांबवा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर घेण्यात याव्या, व पुसद शहरातील नागरिकांना लवकर घरकुल देण्यात यावे व घरकुलाचे थकीत हप्ते घरकुल धारकांच्या खात्यात त्वरित जमा करण्यात यावे अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. तर आयटक च्या वतीने सरकारच्या कार्पोरेट धार्जिण्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध या निवेदनात केला असून कंत्राटी कर्मचाऱ्यांना , अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स,मनरेगा, उमेद कर्मचारी, इत्यादींना किमान 26 हजार रुपये वेतन देण्यात यावे . कामगार विरोधी 4 श्रमसंहिता रद्द करण्यात यावी , आय एल ओ च्या जिन्हेव्हा परिषदेत झालेल्या 189 कायद्यानुसार घरेलू कामगारांना पेन्शन, घरकुल, विमा, रेशन, शासन सुरक्षा प्रदान करून प्रलंबित कल्याण मंडळ रीतसर सुरू करण्यात यावी अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.
यावेळी पक्षाचे तालुका सचिव अमोल गवरशेट्टीवार, किसान नेते सुरेंद्र गडदे, आयटक चे तालुका सचिव डॉ खुर्शीद वजुद, साहेबराव राऊत, एआयवायएफ जिल्हासचिव निखिल टोपलेवार, सामाजिक कार्यकर्ते संतोष अंभोरे, सामाजिक कार्यकर्ते रहेमान चव्हाण वर्कर्स फेडरेशन चे विजकुमार कांबळे, अनवेश सूर्यतळ , आयटक च्या मंदाताई काजळे, सुनीता मोहिते, वनिता थोरात हे प्रामुख्याने उपस्थित होते.











