जिल्ह्यात ‘स्वच्छ माझे अंगण’ अभियान

0
120

प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन

उषा पानसरे मुख्य कार्यकारी संपादक प्रबोधिनी न्युज- ठाणे आज दिनांक- ३१ ऑगस्ट २०२४ राज्याच्या ग्रामविकास विभाग व पाणी व स्वच्छता विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतेच्या बाबींची सवय अंगीकृत करण्यासाठी आता कुटुंबस्तरावर ‘स्वच्छ माझे अंगण’ हे अभियान जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. १ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार असून, यात उत्कृष्ट स्वच्छता असणाऱ्या कुटुंबांचा ग्रामपंचायतीकडून गौरव करण्यात येणार आहे. या अभियानाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा २ अंतर्गत वैयक्तिक शौचालय,
घनकचरा व्यवस्थापन, (कुटुंबस्तर), सांडपाणी व्यवस्थापन (कुटुंबस्तर) राबवीत असलेल्या राज्यातील सर्व कुटुंबस्तरावर या बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन नित्यनियमाने स्वच्छतेच्या बाबींची सवय अंगीकृत करण्यासाठी जे कुटुंब वैयक्तिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापनकरिता शोषखड्डा/परसबाग/पाझरखड्डा, घनकचरा व्यवस्थापनाकरिता कंपोस्ट खतखड्डा अथवा घरगुती खतखड्डा आणि कुटुंबस्तरावर कचराकुंड्या याबाबतची उपलब्धता करून घेतली असून, त्यांचा नियमितपणे वापर करतात अशा कुटुंबांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे अनुकरण करण्याकरिता ग्रामस्थांना, कुटुंबधारकांना त्यांच्या प्रमाणेच वैयक्तिक स्वरुपांच्या स्वच्छतेच्या सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून घेण्यासाठी उद्युक्त करणे ही या अभियानाची संकल्पना आहे.

निवडीचे निकष

घरगुती खतखड्डा/परसबाग वैयक्तिक शोषखड्डा /पाझरखड्डा
वैयक्तिक शौचालय घरगुती कचराकुंड्या

अभियान अंमलबजावणी कालावधीचे टप्पे

अभियान कालावधी ०१.०९.२०२४ ते दि. २५.०९.२०२४
पडताळणी कालावधी दि. २६.०९.२०२४ ते दि. ३०.०९.२०२४
प्रशस्तीपत्र वितरण: दि.०२.१०.२०२४

कुटुंबस्तरावरील प्रत्येक घटकाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन सांडपाणी करण्यासाठी गावातील सर्व कुटुंबामध्ये ‘स्वच्छ माझे अंगण’ अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून उत्कृष्ट व्यवस्थापन करणाऱ्या कुटुंबांना २ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारसकर यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व कुटुंबस्तरावरील प्रत्येक घटकाचे कुटुंब स्तरावर वैयक्तिक शौचालय, शोषखड्डा / परसबाग/पाझरखड्डा, घनकचरा व्यवस्थापनकरीता कंपोस्ट खत खड्डा अथवा घरगुती खतखड्डा आणि कुटुंबस्तरावर कचराकुंडी या बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी होवून स्वच्छतेची सवय अंगीकृत करण्यासाठी लोक चळवळ उभी करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यामध्ये ‘स्वच्छ माझे अंगण’ अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here