सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज – विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने “आला आला श्रावण दारी, पुस्तक वाचू घरोघरी” अनोखा उपक्रम शहापूर तालुक्यातील जि. प.कानडी शाळेत राबवण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी श्रावण महिन्यात गावात एकत्र येऊन पुस्तक वाचन केले. पूर्वी श्रावण महिन्यात गावात अध्याय वाचले जायचे त्याच धर्तीवर मुलांनी मृण्मयी पाटील लिखित पौराणिक कथा ह्या पुस्तकातील तब्बल 22 गोष्टी वाचल्या. “आला आला श्रावण दारी, पुस्तक वाचू घरोघरी” या उपक्रमाचा समाप्तीचा कार्यक्रम दि. 3 सप्टेंबर 2024 रोजी, विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करत संपन्न झाला.
या कार्यक्रमास सर्व शिक्षकप्रेमी, ग्रामस्थांनी खूप मोलाचे सहकार्य केले. यावेळी खरीवली केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.एकनाथ पवार सर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक, शिक्षक, पालक, सर्व समित्या आणि ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन डॉ.गंगाराम ढमके आणि श्री.रमेश पडवळ सर यांनी केले.
आजपर्यंत असा कार्यक्रम आमच्या शाळेत झाला नव्हता. आम्हाला आमच्या मुलांचा आणि शिक्षकांचा अभिमान वाटतो. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र निमसे
संस्कृतीचे संवर्धन व संरक्षण हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने गावातील हरवत चाललेली श्रावणातील अध्याय वाचन संस्कृती एका नव्या स्वरूपात आम्ही या उपक्रमाच्या माध्यमातून सुरू केली आहे. – शिक्षक डॉ.गंगाराम ढमके वरिष्ठ शिक्षक
श्रावण महिन्यात रोज गावात पुस्तक वाचताना अनेक गोष्टी वाचायला मिळाल्या. “आला आला श्रावण दारी, पुस्तक वाचू घरोघरी” या उपक्रमामुळे पुस्तक वाचनाची गोडी निर्माण झाली आहे. – विद्यार्थी .कु.तनया नामदेव देसले इयत्ता पाचवी

