कचरू मानकर तालुका प्रतिनिधी गोंडपिपरी – गोंडपिपरी तालुक्यातील वेडगांव येथील एका गरीब कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा शरद रतन झाडे हा विद्यार्थी बी. ए, डी एड, एम ए आणि राज्य तथा केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा पास असूनही अनेक वर्षापासून शिक्षक भरतीची वाट पाहत आहे तरी शरद झाडे यांनी आपले मत व्यक्त केले माझ्यासारखे पात्र विद्यार्थी असून सुद्धा महाराष्ट्र शासन शिक्षकभरती करण्यात उदासीन आहे. माझ्यासारखे अनेक पात्र उमेदवार आज बेरोजगार आहेत.
महाराष्ट्र राज्याला पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. शिक्षण क्षेत्रातसुद्धा प्रगत राज्य मानले जाते परंतु, सध्याचे शासनकर्ते मात्र शिक्षणाच्या बाबतीत अतिशय उदासीन आहेत. 5 सप्टेंबर 2024 ला ‘शिक्षकदिनी ‘ मा. शिक्षणमंत्री महोदयांनी शिक्षणक्षेत्रातील ‘काळा जिआर ‘ काढून पात्र विद्यार्थ्यांच्या ताटात माती टाकण्याचे काम केलेले आहे. या जिआर नुसार 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळेत एक नियमित शिक्षक आणि एक निवृत शिक्षक किंवा डी. एड., बी. एड. झालेला परंतु ‘शिक्षक पात्रता परीक्षा ‘ अपात्र असलेला सुद्धा विद्यार्थी सहा महिन्यांसाठी शाळेवर घेतला जाईल असे निर्देश दिलेले आहेत.
आजघडीला जवळपास 40,000 शिक्षकांची महाराष्ट्रात गरज आहे. परंतु शासन शिक्षकभरतीसाठी मात्र उदासीन आहे. 2017 ची शिक्षकभरती आज सात वर्षे होऊनही पूर्ण करता आली नाही, त्यातच 2023 ला पुन्हा ‘अभियोग्यता चाचणी’ घेण्यात आली. वित्त विभागाने 80% पदभरतीला मान्यता दिली परंतु काही कारणाने 10%जागा कपात करून 70% जागा भरणार असे शासनाने घोषित केले परंतु, त्यातही अपात्र, गैरहजर जागांचा राउंड अजून बाकी आहे. या 10% जागा आणि अपात्र, गैरहजर जागांचा राउंड विधानसभा आचारसंहितेपूर्वी घेण्यात यावा यासाठी पुण्यात शिक्षणआयुक्त कार्यालयासमोर 20 आगस्ट 2024 पासून सलग दहा दिवस बेमुदत धरणे आंदोलन आणि चार दिवस अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यावेळी आपण येत्या पंधरा दिवसात शिक्षकभरतीचा निर्णय घेऊ असे आश्वासन देण्यात आले परंतु आता 5 सप्टेंबरला मात्र हा काळा जिआर काढून डी. एड, बी. एड अभियोग्यताधारकांच्या भावना दुखावण्याचे काम शिक्षणमंत्री करत आहेत. मी स्वतः तीन वेळा महाराष्ट्र शासनाची ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ आणि केंद्र शासनाची एक वेळा ‘ केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ‘पास आहे. दोन वेळा अभियोग्यता चाचणी दिलेली आहे आणि आज महाराष्ट्रात माझ्यासारखे अनेक पात्र विद्यार्थी असतांना मा. शिक्षणमंत्री केसरकर साहेबांनी जो ‘काळा जिआर ‘ काढलेला आहे आणि आपला सावंतवाडी मतदारसंघ वाचवाण्याचा जो केविलवाना प्रयत्न केलेला आहे त्या जिआरचा आम्ही पात्र उमेदवारांनी जाळून विरोध केलेला आहे.
याद्वारे मा. शिक्षणमंत्री साहेबांना विनंती करतो की, हा शिक्षण क्षेत्रातील काळा जिआर रद्द करून लवकरात लवकर स्थायी स्वरूपाची शिक्षकभरती करून पात्रताधारकांना न्याय द्यावा.

