कारंजा नगरीतील रसिक प्रेक्षकांकडून,झाडीपट्टी रंगभूमीवरील भावनाप्रधान ‘गद्दार’नाट्या कलावंतांचे करण्यात आले स्वागत

0
129

शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी, वाशिम – कारंजा (लाड): अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शताब्दी कार्यक्रमा निमित्त, शाखा कारंजा यांच्या वतीने आयोजीत झाडीपट्टी रंगभूमीवरील ‘गद्दार’ नाटकाचा कारंजा शहरातील पहिला प्रयोग गुरुवार दि. १७ ऑक्टोंबर २०२४ रोजी कारंजा येथील स्व.बाबासाहेब धाबेकर सभागृहात पार पडला. यावेळी कलावंतांकडून वास्तववादी कथानकाचे भावना प्रधान सादरीकरण करण्यात आल्याने, आजवर केव्हाही न पाहीलेल्या झाडीपट्टी नाट्याची आवड रसिक प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली.दमदार अभिनय,भेदक संवाद, एकीकडे जगनसेठला सत्ता आणि संपत्ती प्राप्तीची लालसा तर दुसरीकडे त्यांच्या मुलाची सुभाषची प्रेमकहाणी सैराटची आठवण दाखवून गेली.
आनंद भिमटे लिखित आणि नरेश गडेकर दिग्दर्शित ‘गद्दार’ या नाटकाच्या निमित्ताने झाडीपट्टी रंगभूमीवरील सादरीकरणाचे वेगळेपण काय असते, हे प्रथमच येथे बघायला मिळले. नितू बुद्धे पाटील निर्मिती असलेल्या या नाटकात स्वतः नरेश गडेकर, देवेंद्र दोडके,आसावरी तिडके, देवेंद्र लुटे,अरविंद झाडे,शुभम मसराम,निशांत अरबेले,अमोल देऊलवार,करिश्मा मेश्राम, सुनयना खोब्रागडे,पौर्णिमा तायडे,गंधर्व गडेकर यांनी एकाहून एक सरस अशा अभिनयाचे दर्शन घडविले.
सत्ता आली की पैसा येतो आणि पैसा आला की आपण सगळी व्यवस्था आपल्या तालावर नाचवू शकतो,ही हल्ली बड्या नेत्यांची धारणा बनलेली आहे. पण सत्याची कास सोडलेल्या आणि नैतिकतेशी काहीही घेणेदेणे नसलेल्या या सत्तापिपासूंचा अंतिम निकाल काय असू शकतो यावर अत्यंत भेदक प्रकाश टाकणारे हे झाडीपट्टी नाट्य असून थोडक्यात कथानक असे की,गावातील सत्तांध जगनसेठला महिला आरक्षणामुळे बायकोला सरपंच करायचे असते.हे काम सोपे नसते.यासाठी तो नाना युक्त्या क्लुप्त्या वापरतो आणि बायकोचा विजय खेचून आणतो. यात तो आपल्या राजकीय गुरुलाही पछाड देतो.जगनसेठची बायको सत्वशील पतिव्रता नारी आणि सत्याची कास धरणारी समाजसेविका असते.
त्यांचा मुलगा सुभाषही सुविचारी असतो. त्याचे जगनसेठचे एकेकाळीचे राजकीय गुरू परंतु त्यांच्या सत्ता लालसेचे विरोधक असलेल्या रामभाऊ यांच्या संध्या नामक मुलीवर प्रेम असते.सुभाष तिला लग्नाच्या आणाभाका देतो. प्रेमात आंधळे होऊन दोघेही मर्यादा ओलांडतात त्यातून संध्या गर्भवती होते. त्यांच्या प्रेमाला कुणीही स्विकारत नाही पुढे सैराट होऊन ते विवाह करतात. संसारवेलीवर गोंडस छकुली जन्म घेते आपल्या मुलीला बघून वडील स्विकारतील असे तीला वाटते परंतु माहेरच्या साडी मधील कथानका प्रमाणे वडील तीला स्विकारत नाहीत.अखेर एका अपघातात मायलेकीचा मृत्यु होतो.सुभाष वेडा होतो. भ्रष्टाचाराचा आरोप होऊन ग्रामसेवक वाकडे निलंबीत होतो. तर महिला सरपंच राजीनामा देऊन आपल्या वेड्या मुलामध्ये जीव अडकून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात.येथून पुढे जिवघेण्या संघर्षास सुरुवात होते.अखेरीस जगनसेठच्या हातून मुलाची हत्या होते. अतिशय थरारक अशा या
नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन समारंभाला अध्यक्ष म्हणून प्रतिष्ठित हृदयविकार तज्ञ डॉ.अजय कांत यांची उपस्थिती होती.प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र चवरे,सुधाताई चवरे,ॲड.मंगलाताई नागरे, राधाताई मुरकुटे,निर्माते नितू पाटील,नियामक मंडळ सदस्य उज्वल देशमुख,नंदकिशोर कव्हळकर,समिक्षक अशोक मानकर,अभा . ना.प .शाखाध्यक्ष प्रमोद जिरापुरे,प्रवीण साबू यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारंजा शाखेचे प्रमुख कार्यवाह प्रसन्न पळसकर यांनी केले,उपाध्यक्ष श्रीकांत भाके,आश्विन जगताप,आनंद खेडकर,कोषाध्यक्ष शशीकांत नांदगावकर,अतुल धाकतोड,अंकीत जवळेकर,सदस्य रोहित महाजन,दिनेश कडोळे,अंकित जवळेकर,शकील शेख,प्रणिता दसरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.’गद्दार’ झाडीपट्टी नाटकाकरीता वृत्तपत्राद्वारे प्रसिद्धीची जबाबदारी स्विकारणाऱ्या महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त लोककलावंत तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांचा नियामक मंडळ उपाध्यक्ष तथा दिग्दर्शक नरेश गडेकर यांनी मध्यांतराचे वेळी पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान केला.या यशस्वी अशा कार्यक्रमाचे आयोजना बद्दल अभा. मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबईचे उपाध्यक्ष नरेश गडेकर यांनी नंदकिशोर कव्हळकर,उज्वल देशमुख आणि कारंजा शाखाध्यक्ष प्रमोद जिरापुरे यांचा शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा रगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाखेतर्फे करण्यात आले.असे वृत्त संजय कडोळे यांनी कळवीले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here