कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
जनमतचा आशिर्वाद घेऊन निवडून येताच मतदारांना वाऱ्यावर सोडून मुंबई गाठणाऱ्या व सत्तेच्या मदमस्तीत तोऱ्यात मिरविणाऱ्या नेत्यांची संख्या राजकारणात काही कमी नाही. मात्र ज्यांनी आपल्याला जनसेविकरीता प्रतिनिधित्व देऊन मोठी जबाबदारी सोपविली. त्यांच्या अपेक्षांवर खरे उतरून सामान्यांच्या कुटुंबातला सदस्य समजून लोकहित जोपासणारे विजय वडेट्टीवार यांच्या सारखे सामान्यांशी ऋणानुबंध जपणारे नेतृत्व फारच कमी आहे. याचा प्रत्यय ब्रह्मपुरी शहरात नुकतेच निघालेल्या संवाद पदयात्रेतून आला.
गेल्या दशकापासून ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधित्व राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार हे करीत आहे. क्षेत्राचा सर्वांगीण विकास यासह मानव सेवा हाच खरा धर्म हे मानून जनतेसाठी समर्पित भावना जपणारे ,जनतेच्या प्रत्येक सुखदुःखात धावून जाणारे भाऊ अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील विजय वडेट्टीवार या कर्तव्य तत्पर नेतृत्वाचे नाव प्रत्येक घरातील महिला भगिणी व आबाल वृद्धांपर्यंत पोहचले आहे.
सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अशातच निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असतांना ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राकरिता महाविकास आघाडी तथा घटक पक्षाकडून उभे असलेले काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी शहरातील नागरिकांशी संवाद थेट भेट घेण्यासाठी शहरातून पदयात्रा संवाद रॅली काढली. या दरम्यान त्यांनी पत्नी किरण वडेट्टीवार, मोठी कन्या रोशनी वडेट्टीवार, शिवानी वडेट्टीवार असे सहकुटुंब छोट्या उपहार गृह, पानटपरी तसेच मोठ्या व्यवसायिकांच्या व्यवसाय प्रतिष्ठानाला भेट दिली. सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन हा वडिलांचे छत्र हरपल्यानंतर स्वबळावर कुटुंबाची जबाबदारी तसेच सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन विविध आंदोलने करून आज राज्याच्या विरोधी पक्षनेते पदी विराजमान झालेल्या विजय वडेट्टीवार यांच्या पाय जमिनीवर ठेवून कार्य करण्याच्या पद्धतीला बघून काहींनी हातात हात देऊन, तर काहींनी गळाभेट व वयोवृद्धांनी मायेचा हात फिरवून आशिर्वाद दिला. जनभावनेचा अनमोल ठेवा जपणाऱ्या विजय वडेट्टीवार रुपी असामान्य नेतृत्वाबद्दल जनसामान्यात असलेली महत्वकांक्षी प्रेम भावना, आदर व सन्मान बघून उपस्थित नागरिक भारावले.

