वाशिम जिल्हा प्रतिनिधी शारदा भुयार – कारंजा (लाड) : यवतमाळ आणि वाशिम दोन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या लोकसभा मतदार संघाच्या आजतागायतपर्यंत प्रत्येक वेळी यशस्वी ठरलेल्या संपूर्ण राज्यातील एकमेव अपराजित महिला खासदार म्हणून ज्यांच्या नावे सुवर्णाक्षरांकित इतिहास आहे. अशा आमदार भावना गवळी यांच्या मंत्रीमंडळातील प्रवेशाची मागणी संपूर्ण जिल्ह्यातील महिला मंडळीसह,शेतकरी,ग्रामस्थ नागरीक व विविध संघटना कडून होत आहे.विशेष म्हणजे वाशिम जिल्ह्याची मुहूर्तमेढ ज्येष्ठ शिवसेना नेते स्व.पुंडलिकराव गवळी यांच्या माध्यमातून रोवण्यात त्यांना यश मिळाले होते.यदाकदाचित त्यावेळी वाशिम जिल्हा झालाच नसता तर जिल्ह्याच्या सर्वच तालुक्याचा भूभाग आणि नागरिकांना परजिल्ह्यात जावे लागले असते.आज रोजी मात्र वाशिम जिल्हा होऊनही आकांक्षित जिल्हा म्हणून जिल्ह्याच्या मागासलेपणाची ओळख आहे.तेव्हा सदरहू जिल्ह्याला आर्थिक विकासाच्या दरीमधून बाहेर काढण्यासाठी आणि येथील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी येथे जिल्ह्याचा स्थानिक मंत्री मंत्रीमंडळात असणे अत्यावश्यक आहे.त्यादृष्टिने सारासार विचार करून मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनाताई गवळी यांची वाशिम जिल्ह्याच्या वतीने मंत्रीमंडळामध्ये निवड करावी अशी मागणी विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे,उमेश अनासाने, प्रदिप वानखडे,लोमेश चौधरी, अजाबराव ढळे, शेषराव पाटील इंगोले,कांताबाई लोखंडे, इंदिरा मात्रे, देवका इंगोले आदींनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे. विशेष म्हणजे आ.भावनाताई गवळी यांनी सलग पाच वेळा लोकसभेत ह्या मतदार संघाचे खासदार म्हणून नेतृत्व केलेले असून,राज्यात अपराजित खासदार म्हणून त्यांची ओळख असून सध्या त्या विधान परिषदेच्या विद्यमान आमदार आहेत.त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून त्यांचा मंत्रीमंडळात समावेश होण्याची जिल्हावासियांकडून मागणी होत आहे.

