प्रा. राजकुमार मुसणे , गडचिरोली
प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमी ही नाटकासाठी व रसिक प्रेक्षकांच्या नाट्यनिष्ठेमुळे प्रसिद्ध आहे . बहुतांश गावात झाडीपट्टीतील नाटक होतेच.झाडीपट्टी रंगभूमी ही स्वागतशील व सर्वसमावेशक अशी व्यापक आहे. यापूर्वीही झाडीपट्टीने मराठी नाट्यसृष्टीतील लोकप्रिय नाटकाचे प्रयोग झाडीपट्टी परिसरात यशस्वीपणे केले आहेत. मृच्छकटिका, कान्होपात्रा, संशयकल्लोळ, मोरूची मावशी, एकच प्याला ,दिल्या घरी तू सुखी रहा ,लावणी भूलली अभंगाला ,सिंहाचा छावा,स्वर्गावर स्वारी, मल्हारी मार्तंड, येळकोट मल्हार, आग्र्याहून सुटका, राजा शिवछत्रपती, इच्छा माझी पुरी करा ,देवमाणूस असे अनेक गाजलेली नाटके झाडीपट्टी रंगभूमीवर रसिक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात झालेली आहेत. झाडीपट्टी रंगभूमीचे संगीत हे प्राण आहे. संगीत नाटकांना झाडीपट्टीत विशेष मागणी असते. त्यामुळे सातत्याने मागील वीस वर्षांपासून अनुराग नाट्यसंपदा रसिकांच्या संगीत प्रेमासाठी पुढाकार घेत संगीत नाटकांचे आयोजन करत असते.नुकताच २४ डिसेंबर२०२४ ला नवोदय नाट्यकला मंडळ महागाव यांच्या सौजन्याने अनुराग नाट्य संपदा द्वारा प्रस्तुत नागेश जोशी लिखित, भास्कर पिंपळे निर्मित व दिग्दर्शितसंगीत तीन अंकी’देवमाणूस ‘ नाटकाचा यशस्वी प्रयोग महागाव जि. गोंदिया येथे झाला. नाट्यप्रयोगाचे उद्घाटन ज्येष्ठ कलावंत मधु जोशी यांच्या शुभहस्ते, नटसम्राट पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांच्या अध्यक्षतेखाली, ज्येष्ठ कलावंत माजी न्यायमूर्ती ज्ञानदेव परशुरामकर, डॉ.राजकुमार मुसणे, प्राचार्य यशवंतजी परशुरामकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
एखादा व्यक्ती स्वसुखाचा त्याग करीत दुसऱ्यांच्या भल्यासाठी अर्थात सत्कर्मासाठी आयुष्य खर्ची घालतो.मानव्याच्या भूमिकेने दीनदुबळ्या विषयीचा कळवळा असणारा ,दुसऱ्याच्या सुखात आनंद मानणारा, सहिष्णुवृत्तीच्या माणसाच्या आयुष्यातही दुःख कसे आपसूक येते. किंबहुना रक्ताच्या नात्याला जीवापल्याड जपूनही संशयाने त्यांच्याकडून कृतघ्नतेची वागणूक कशी मिळते, याचे दर्शन ‘देवमाणूस”या कौटुंबिक नाटकाच्या माध्यमातून घडले.अकारण दुराग्रहाने सभ्य गृहस्थाविषयीसुद्धा टोकाचे विचार उद्भवून प्रतिमा डागाळत पेचप्रसंग कसे निर्माण होतात. एकजीवाने नांदणाऱ्या स्वकीयाचे अकारण मनभेदाने विभक्त होणाऱ्या ताटातूटीचे दर्शन नाटकातून होते.
विश्वनाथ दादा हा सर्वांचे भले चिंतणारा ,परोपकार करणारा ,स्वातंत्र्याबरोबरच सुरक्षिततेची काळजी घेणारा, सहानुभूती बाळगणारा कळवळा असणारा प्रामाणिक, निरपेक्ष वृत्तीचा , प्रेयसीसाठी गजरा घेऊन जात असताना एका घरून किंकाळी ऐकायला आली. तिच्या मदतीसाठी तो धावत गेला त्याच क्षणी प्रियशीने त्याला पाहिले . ते वेश्येचे घर असल्याने आळ घेतला, दुरावा वाढत आत्मीयतेचे नाते विस्कटत लग्नाचे स्वप्न भंगले. प्रेमभंगाचे शल्य बोचत असल्याने अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. लहान भाऊ व बहीण नंदिनी यांना त्यांच्या इच्छेनुसार जोडीदार निवडण्याकरिता स्वातंत्र्य दिले.
सुहासच्या सांगण्यावरून रागिणीच्या डोक्यात संशयाचे भूत शिरते.दादांची प्रतिमा डागाळत त्यांच्या प्रांजल व्यक्तिमत्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. सुहासचे रागीणीवर महाविद्यालयीन जीवनात असलेले प्रेम आणि तिने त्याचा केलेला अपमानाचा बदला घेण्यासाठी सुहास कट रचतो .त्यात रागिणी पूर्णत: फसते. सहानुभूतीपासून पारखे करण्याचा डाव सुहास चतुराईने जिंकतो. त्यांच्या जाळ्यात रागिणी अडकते. गैरसमजाने सुहासच्या अब्रूवर उडवलेल्या शिंतोड्याचा बदला घेण्यात सुहास यशस्वी होतो.
नवऱ्याला सांगून दादांना बेदखल करीत विभक्त होण्याविषयी रागिणी अट्टाहास करते. संपत्तीतील अर्धा वाट्याची मागणी करते. हे सर्व एकूण दादांना प्रचंड मन:स्ताप होतो. परिणामी ते संपूर्ण संपत्ती भाऊ व रागिणीला देत सर्वस्वाचा त्याग करीत घराबाहेर पडतात. ही गोष्ट अनिल आणि नंदिनीला खटकते. अनिल रागिणीला नंदनपूर कॉलेजमधील स्वैर कारनामे उघड करीत तिला खडसावतो. दादाला नंदिनी, अनिल आणि जीवबा प्रयासाने मध्यस्थी करून दादांना परत घरी आणण्यात यशस्वी होतात. सुहास स्वतःच रागिणीसमोर सर्व खुलासा करतो . रागिणीला पश्चाताप होतो. एकंदर नाटकाचे स्वरूप असे आहे.
शेती पिकली नाही म्हणून खंड न घेणारा, इतरांविषयी प्रचंड कळवळा असणारा, भूतदयावादी, सर्वाँना निवडीचे स्वातंत्र्य देणारा ,पाण्याचा निर्मळ झरा ,दादा ( सिनेस्टार देवेंद्र दोडके), दादांवर विशेष प्रेम असूनही पत्नीच्या अट्टाहासाने दुरावा निर्माण करणारा विलास (उमेश जाधव), कलंदर वृत्तीचा, स्नेहबंधने रसातळाला गेल्याने एकलकोंडा झालेला, बालपणी आईविना पोरका तरुणपणी स्वप्नांचा चक्काचूर झालेला जीवनाचे सर्व मार्ग बंद झाल्याने उद्विग्न, रागिणीवर प्रेम केल्याने तिने केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी कारस्थान करणारा प्रसंगी तिला माणुसकीची जाणीव करून देणारा सुहास ( सिनेस्टार नरेश गडेकर), स्वतःच्या डोक्यांपेक्षा इतरांच्या इशाऱ्यावर नाचणारी आणि नात्यातील ताटातूट करणारी, माणसांपेक्षा दौलत प्यारी असणारी,दुराग्रही रागिणी (सिनेस्टार आसावरी तिडके), नंदिनी वर प्रेम करणारा प्रांजळ व्यक्तिमत्त्वाचा अनिल ( स्वर सम्राट भास्कर पिंपळे ),दादांवर विशेष प्रेम असणारी नंदिनी (देवयानी जोशी) , कष्टाचे मोल जाणवणारा प्रामाणिक जीवबा (राजेश शेरकी) या कलावंतांच्या अभिनय सामर्थ्यामुळेही नाटकाची रंगत वाढली. हक्काची बैलगाडी,पिंजऱ्यातील पोपट लंगडा होता,डोळ्याला पाणी लावणे, उखाणे अशा प्रसंगांद्वारे निर्माण झालेल्या विनोदाने प्रेक्षक हसतात.
स्वरसम्राट भास्कर पिंपळे यांनी गायीलेल्या सुमधुर नाट्यसंगीताने रसिक प्रेक्षक तृप्त झाला. ‘दिलरुबा मधुर हा दिलाचा’ भीमपलास रागातील, ‘चांद माझा हासरा, ‘सुखवित या संसारा’ या मालकंस रागातील आशयसुचक नाट्यगीतांने प्रेक्षकांनी तल्लीनतेबरोबरच मंत्रमुग्ध होत वन्स मोरची मागणी करीत संगीताचा आनंद लुटला. पायपेटी दीनानाथ बाळबुद्धे,तबला कुर्वे,ऑर्गन संगीतकार प्रल्हाद मेश्राम ,राकेश यांची उत्तम संगीत साथ व प्रकाश योजना, प्रल्हाद आर्टच्या स्पेशल लाईट इफेक्टमुळे व नेपत्त्याने तथा भोयर साऊंड सर्व्हिसची ध्वनी व्यवस्थेमुळे रसास्वादात रंगत आली.आजच्या तंत्रयुगात आधुनिकतेकड़े कल असलेल्या जगात संगीत नाटकाचा एक रसिकवर्ग आहे. जो रात्रभर शांतपणे नाटक बघत आस्वाद घेत.. प्रतिसाद देतो. त्यामुळेच नाटक सफल होण्यात नाट्य रसिकांचा प्रतिसाद प्रामुख्याने जाणवला. निश्चितच अशी नाटके आणखी व्हायला हवीतच.
मध्यमवर्गीय कौटुंबिक व्यवस्थेचे प्रतिबिंब असलेल्या या नाटकांत दोन वेगवेगळ्या विचारसरणीची माणसे एकाच प्रसंगात, वेगवेगळ्या स्वरूपात कसे वागतात याचे भेद म्हणजे देवमाणूस नाटक. आई-वडिलांचे छत्र गमावल्यानंतरही दादा आपल्या विलास आणि नंदिनी या दोन्ही भावंडांना चांगले संस्कार आणि शिक्षण देऊन नंदिनीचे अनिलशी आणि विलासचे रागिणीशी लग्न होते. सुखी संसार सुरू होतात. पण एक दिवस रागिणीचा पूर्वाश्रमीचा प्रियकर सुहास घरात प्रवेश करतो आणि रागिणीच्या मनात दादांविषयी नको त्या गोष्टी भरवून देतो. त्यावर विश्वास ठेवून रागिणी दादांकडे वेगळे होण्याची आणि इस्टेटीतल्या अर्ध्या हिश्श्याची मागणी करते.सुहास रागिणीचा दादांबद्दलचा गैरसमज करून देतो. रागिणीच्या मागणीप्रमाणे त्यांना इस्टेटीतला हिस्सा मिळतो, दादांबद्दलचे निष्कारण मन कलुषित होते.कोणत्याही व्यक्तीला पुरावा नसताना, निव्वळ एखाद्या संशयावरून बदनाम केल्यास त्या व्यक्तीच्या पूर्ण जीवनाची कशी वाताहत होते याचे प्रत्यंतर देवमाणूस नाटक होय. दादांचा सिनेस्टार देवेंद्र दोडके यांनी हावभाव, चेहऱ्यावरील छटाद्वारे रसनिष्पत्ती करणारा अभिनय वाखाण्याजोगा होता. कटकारस्थानी सुहासची आंतरिक तडफड नरेश गडेकर यांनी आंगिक अभिनयातून उत्तम साकारली. आसावरी तिडके,देवयानी जोशी, भास्कर पिंपळे, महेश जाधव व राजेश शेरकी यांनीही अभिनयाद्वारे पात्र जिवंत केले. घराच्या नेपत्यात उभा केलेल्या एकाच सेटद्वारे कुटुंबात घडणारे नाट्य झाडीपट्टीतील अनेक पर्वेशी पडद्याची नाटके पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही भावला.
कुटुंबाच्या कल्याणासाठी अहर्निश परिश्रम करणाऱ्यांच्या वाट्याला येणारे दुःख , स्वकियाकडून भोगावे लागणाऱ्या यातना, आंतरिक खळबळ,त्यात त्याची काय चूक? असा प्रश्न उपस्थित होतो .किंबहुना अनपेक्षित उद्भवलेल्या प्रकरणाने भांबावलेल्या दादा हतबल होतो. सरतेशेवटी सुहासचा दादापासून विभक्त होऊ नका हा टाहो मनाचा ठाव घेत काळजाला भिडणारा आहे. सगळी मोहाची बंधने झुगारत आप्तेष्टांसाठी आटापिटा करणाऱ्या माणसातील देवत्वाचे नाटय म्हणजे देवमाणूस नाटक आहे.
देवमाणूस हे नाटक सिनेस्टार देवेंद्र दोडके , नरेश गडेकर, आसावरी तिडके ,भास्कर पिंपळे , उमेश जाधव, देवयानी जोशी,राजेश शेरकी या सिनेस्टार कलावंतांच्या कसदार अभिनयामुळे व संवादातील परिणामकारकतेमुळे प्रभावी ठरले.
‘मोत्यासाठी माती कुस्करावी लागते शेतकऱ्याला,’
देव दगडाचा असला तरी माणूस रक्त मासाचा असतो.’ काही जनावर देखील माणसासारखे वागतात’. जन्मताच खलपुरुष जन्माला येत नाहीत.’ ‘वासनातृप्तीची तहान पण लग्नाची जबाबदारी नको, पर्णविहीन झाडांच्या सावलीची अपेक्षा कोण करणार.’? अशा संवादाने प्रेक्षक डोळसपणे अंतर्मुख होत विचारप्रवृत्त होतो. अर्थातच स्वकेंद्री ,स्वार्थी मनोवृत्तीच्या व्यक्ती -समाजाला नात्यांना जोपासा, हीच खरी संपत्ती असल्याचा संदेश देण्यात नाटक यशस्वी ठरले.
प्रा. राजकुमार मुसणे, आष्टी, गडचिरोली

