शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी वाशिम – कारंजा (लाड) : एकवेळ वाल्याचा वाल्मिक होऊ शकतो. व्यसनी व्यक्ती सुधारून व्यसनमुक्त होऊ शकतो.पूर्वेचा सुर्य पश्चिमेला आपल्या उगवत्या स्थितीचे मावळतीला दर्शन देवू शकतो. परंतु धनसंपत्तीच्या मोहात अडकलेला स्वार्थी मतलबी व्यक्ती हा आयुष्यभर सज्जन होऊ शकत नाही. मृत्युपर्यंत त्यांची धनलालसा सुटत नाही. हे त्र्यैलोक्यबाधित कटूसत्य आहे.असे विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष ज्येष्ठ प्रबोधनकार संजय कडोळे म्हणाले आहेत. त्यांनी अधिक बोलतांना सांगीतले की, आईच्या उदरातून जन्मल्यानंतर प्रत्येक जीवात्मा सुकूमार, सात्विक,निरागस,सत्यम, शिवम्,सुंदरम् म्हणून जन्माला येत असतो.पापी असो वा पुण्यवान कोणतेही आईवडिल आपल्या मुलांवर सदैव सुसंस्कारच घडवीत असतात. मात्र मुले हे सभोवतालच्या परिस्थिती प्रमाणे संस्काराचे ग्रहण करीत जातात.त्यात काही व्यक्ती त्यांच्या सभोवतालच्या सुसंस्कारामुळे देवरूप सज्जन होऊन जातात.तर अनेक जण स्वार्थाच्या आहारी जाऊन धनाढ्य होण्याच्या मोहात बरबटून जातात.त्यांची संपत्तीची लालसा दिवसागणिक एवढी वाढत जाते की, आपल्या स्वार्थाच्या आणि संपत्तीच्या मोहापायी ते नातीगोती,आप्तस्वकियांनाही विसरून जात असतात.जर्र, जमिनीच्या लालसेने ते साम-दाम-दंड-भेद आदी कुनितीचा वापर करतात.अशा पांढरपेशा व्यक्ती वरून सज्जनता आणि प्रामाणिकतेचा आव आणतात.प्रथमदर्शनी हसतमुख राहून,गोड गोड बोलून त्या आपला स्वार्थ साधतात.आणि गोड बोलून जर त्यांना त्यांचा स्वार्थ साधता आला नाही तर शेवटी मात्र हमरीतुमरीवर येऊन,कोणत्याही वाईट थराला जात असतात. या जगात गरिबी आणि श्रीमंती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. गरीबांची समाजाकडून सदैव उपेक्षा किंवा हेळसांड होत असते.मात्र उपासमारीवर विजय मिळवीत गरिबीमध्येही काही व्यक्ती ह्या समाधानी जीवन जगतात.तर काही परिस्थितीने व्यसनाधिन होऊन जातात.मात्र कोणताच व्यसनी व्यक्ती वाईट नसतो.हे आदी अनादी पुरातन काळातील अनेक उदाहरणांवरून स्पष्ट झाले आहे. व्यसनी व्यक्ती नेहमी सत्यवचनीच असतो.त्याचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे असे केव्हाच नसते.व्यसनी व्यक्तीलाही व्यसनाधिनतेतून बाहेर पडावे असे वाटत असते.व्यसनी व्यक्ती हा एकदा व्यसनाच्या आहारी गेला म्हणजे त्यातून बाहेर पडणे कठीण असते.परंतु व्यसनातून बाहेर पडणारी व्यक्ती देखील पुष्कळ आहेत.म्हणजेच व्यसनी व्यक्ती कायमचे निर्व्यसनी होऊ शकतात.म्हणजेच वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो.परंतु वाल्याचा वाल्मिक होणारी व्यक्ती ही सत्यवचनी असते.त्यामुळे त्यांच्या बदलेल्यानेही अनेकांच्या पोटात पोटशूळ उठत असतो. अनेकांना कोणी सुधारले तर खपवून घेता येत नाही.हे देखील वास्तव आहे.इथे बघा वाईट व्यक्ती सुधारू शकतात. व्यसनाधिन व्यक्ती कायमच्या निर्व्यसनी होऊ शकतात.मात्र मधुर हास्य,गोड बोलणे आणि सज्जनतेचा आव आणणारी परंतु धनसंपत्ती किंवा जर्रजमिनीच्या मोहाने ग्रस्त असणारी व्यक्ती मरेपर्यंतही सुधारू शकत नाही ही सत्यस्थिती आहे.त्यामुळे स्वार्थी मतलबी लोकं त्यांची मानसिकता बदलणार तरी केव्हा ? हा समाजाला पडलेला गहन प्रश्न आहे.आपल्या भारत देशात अनेक संत महंत विद्वान मंडळींनी स्वार्थी व्यक्तींना उपदेश करण्यात आपले संपूर्ण आयुष्य वेचले.परंतु तरीही यांच्या पालथ्या घड्यावर पाणी पडत आहे. स्वार्थी व्यक्ती ह्या सुधारतच नाहीत.त्यामुळे अखेरीस स्वार्थी मतलबी व्यक्तींचे धन संपत्ती जर्रजमीन नेहमी वाया जात असते.मधुमेह-कर्करोग या सारख्या दुर्धर आजाराचे बळी होऊन यांना स्वतःच्या धनसंपत्तीचा उपभोग घेता येत नाही.एक दिवस यांचा अंत वाईट होतो.यांच्या हव्यासाने यांची वंशवेल नष्ट होते.व अखेर यांनी स्वार्थाच्या अनगिनत हव्यासाने मिळवीलेले यांचे राजमहाला प्रमाणे असणारे वाडे आणि हवेल्या निर्मनुष्य होऊन पडीत पडतात.हे वास्तव आहे. त्यामुळे स्वार्थ सोडून माणसाने माणसात येवून मानुसकीचा अनुग्रह स्विकारून समाजातील सहकार्याशी सहकार्याची भूमिका घेत निःस्वार्थ जीवन जगले पाहीजे. मनुष्य देह हा नश्वर आहे. त्यामुळे स्वार्थी जीवन जगत पापाचे भागीदार होण्यापेक्षा इतरांशी सत्य अहिंसा प्रेम सहानुभूती आणि धर्माचरणाने वागून पुण्यवंत झालं पाहीजे.असे मनोगत विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष ज्येष्ठ प्रबोधकार संजय कडोळे यांनी मांडले आहे.

