शासकीय आर्थिक मदतीची मागणी
तिवसा प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – अंजनसिंगी शेत शिवारात मेंढपाळ सुधीर शिंदे मु. पो. कुऱ्हा ता. तिवसा, जि. अमरावती तसेच गंगाधर शिंदे मु. पो. जळका जगताप ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती हे या गावातील रहिवासी असून ते भूमिहीन आहेत. तसेच ते मेंढपाळ असून प्रामुख्याने त्यांचा व्यवसाय परिवारासह घर – दार सोडून जंगलात मेंढीचे पालन करणे हा आहे. त्या व्यवसायातून ते त्यांच्या प्रपंचाचा उदरनिर्वाह चालवित असतात. सर्व सुरळीत चालू असतांना अचानक अंजनसिंगी शेत शिवारात मेंढ्या चरत असतांना त्या चाऱ्यातून झालेल्या विषबाधेमुळे मेंढपाळ बंधूंच्या ५ दिवसांच्या कालावधीत टप्प्या टप्प्याने सुमारे ६५ ते ७० मेंढ्या दगावल्यामुळे हताश झालेल्या मेंढपाळ कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
सदर मेंढ्यांच्या कोणत्याही प्रकारचा विमा काढलेला नव्हता. हल्ली उर्वरित मेंढ्या अंजनसिंगीच्या शेत शिवारात चरत आहे व त्या ठिकाणी जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयामार्फत मोबाईल अँब्युलन्स व काही लोकांच्या टीमची व्यवस्था मा. उपायुक्त साहेब, जिल्हा पशुसंवर्धन विभाग, अमरावती यांनी करून दिली आहे. सदर नुकसान ग्रस्त मेंढपाळ यांनी सुमारे ७ ते ८ लाखांचे नुकसान झाले म्हणून आपले पाऊल आत्महत्येकडे उचलले होते, परंतु आम्ही व तेथीलचे काही लोकं त्यांच्या बेड्यावर गेलो व त्यांची सांत्वना करून त्यांचे मनोबल, धैर्य वाढवले व त्यांना आत्महत्येपासून थांबवले. सदर निवेदनाद्वारे नुकसान ग्रस्त मेंढपाळ कुटुंबियांना शासकीय आर्थिक मदतीची तरतूद व्हावी व तशी मदत मिळावी जेणेकरून सदर मेंढपाळ आत्महत्येकडे वळणार नाहीत. अशी मागणी मा. पालकमंत्री, मा. जिल्हाधिकारी, मा. खासदार, मा. आमदार यांना करण्यात आली. सदर निवेदन धनगर समाजाच्या वतीने देण्यात आले. निवेदन देतेवेळी अमित महात्मे, निखिल घुरडे, श्याम बोबडे, ॲड. अचल कोल्हे, सुरेश लोथे आदी उपस्थित होते.

