कुरुड येथे गुरुवारला रंगणार नऊ प्रयोगांचा कलगीतुरा

0
243

आदरतिथ्य, पाहुण्यांची वर्दळ,नाट्यनिष्ठा व सांस्कृतिक अस्मिता जोपासणारे गाव

प्रा.राजकुमार मुसणे

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क गडचिरोली: पुर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात नावलौकिक मिळवलेल्या कुरूड येथे मागील दिडशे पेक्षाही अधिक वर्षाची परंपरा कायम राखत यावर्षी देखील एकुण नऊ प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
आदिवासी बहुल नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामीण ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या कुरूड या गावात स्व. डोंगरवार गुरुजींनी समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून रोवलेल्या इवल्याशा रोपट्यास आजमितीस मोठ्या वृक्षाचें स्वरूप प्राप्त झाले आहे. पूर्वी कुठल्याही सोयी- सुविधा उपलब्ध नसतानाही तुटपुंज्या साधनांद्वारे सादर करण्यात आलेल्या “माझी जमीन” या नाटकाच्या आयोजनाने येथील नाट्य प्रेमींना वेड लावले . आजमितीस मोठ्या प्रमाणात नाट्य प्रयोग सादर करण्याची परंपरा या गावात कायम केल्या गेली आहे.
दरवर्षी तीळसंक्रांतीपासून चौथ्या गुरुवारी कुरुड येथे शंकर पट व मंडईचे आयोजन तथा नाट्यप्रयोग करण्याची परंपरा अविरत जोपसली आहे. दरवर्षी या गावात एकाच रात्री किमान सात ते आठ नाट्य प्रयोग आयोजनाची परंपरा यावर्षी देखील कायम राखण्यात आली आहे. स्व.धाडुजी रामटेके यांच्या दिग्दर्शनात स्थानिक कलावंतांना घेऊन सादर केल्या गेलेल्या अनेक पौराणिक व ऐतिहासिक नाटकांनी या गावाला नाटकाचे माहेरघर म्हणून ओळख मिळवून दिलेली . स्थानिक अनेक कलावंतांनी झाडीपट्टी नाट्य क्षेत्रात लौकिक प्राप्त केला आहे .नाटककार किशोर मेश्राम यानी चाळीस पेक्षाही अधिक सामाजिक, कौटुंबिक ,समस्य प्रधान नाटके लिहिलेली असून त्यांचें यशस्वी प्रयोग झाडीपट्टीत झालेले आहेत. अर्थातच झाडीपट्टी रंगभूमीच्या इतिहासात कुरूड येथील रंगकर्मींचे योगदान गौरवाने उल्लेख करण्याजोगेच आहे.प्रारंभी स्थानिक मंडळांकडून हौशी नाटकाचे आयोजन करण्यात येत होते परंतु बदलत्या काळानुरुप गावात आता व्यावसायिक नाटकांचे आयोजन करून एकाच दिवशी नऊ प्रयोगांच्या आयोजनाने परंपरा कायम राखली आहे. कुरुड येथे ६ फेब्रुवारी २०२५ एका रात्री नऊ नाटकांची मेजवानी आहे.
पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमी ही जनसामान्य रसिक प्रेक्षकांच्या आश्रयावर आधारलेली नाट्यप्रयोगाच्या लक्षणीय संख्येमुळे लोकप्रिय आहे. दिवाळी ते होळी दरम्यान चालणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीतील विविध सामाजिक, कौटुंबिक, समस्याप्रधान नाटकातून रंजन व प्रबोधन केले जाते. एकाच रात्री अनेक नाटकांचे प्रयोग हाउसफुल्ल चालणारी अनेक गावे प्रत्येकाच्या हातात मोबाईल असण्याच्या मल्टिमीडियाच्या आधुनिक काळातही झाडीपट्टीमध्ये प्रकर्षाने आहेत. कुरुड ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली येथे सहा फेब्रुवारीला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शंकरपट व मंडईचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व पाहुणे एकत्र येण्याच्या माध्यमातून लग्न जुळवण्याच्या, नातेसंबंध जोपासण्याची परंपरा दीर्घ काळापासून सुरू आहे.त्यानिमित्ताने झुरे मोहल्यात प्रल्हाद नाट्य रंगभूमीचे दत्त प्रासादिक नाट्य समाज झुरे मोहल्ला आयोजित प्रल्हाद मेश्राम लिखित संगीत ‘ पेटलेल्या चुली ‘, श्रीराम मंदिर देवस्थान कमेटी सुभाष वार्ड जय दुर्गा नाट्य मंडळाचे , कसे तोडू मी मंगळसूत्र’ , हे नाटक श्री दत्त प्रासादिक नाट्य समाज पारधी मोहल्ला येथे रंगतरंग नाट्य रंगभूमीचे ‘ अंधारलेल्या वाटा ‘, हनुमान प्रासादिक नाट्य मंडळ पाटीलपुरा आयोजित शिवचंद्र नाट्य कला रंगभूमीचे संगीत ‘अंधारातील लाल दिवा ‘, हे नाटक, नूतन शेतकरी नाट्य संपदा कांबळी मोहल्ला येथे युवा रंगमंचचे ‘ लाडका ‘ हे नाटक ,कस्तुरबा समाज मंदिर ढीवर मोहल्ला येथे स्थानिक मंडळाचे’ सौदा सुहासिनीचा’ हे नाटक ,पंचशील नाट्य कला मंडळचे गुरुदेव रंगभूमीचे ‘आहुती ‘ हे नाटक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नवयुवक मंडळाच्या वतीने जंगी मुकाबला व त्रिमूर्ती नाट्य कला मंडळ होळी चौक यांच्या वतीने ढोलकीच्या तालावर सदाबहार लावणी कार्यक्रम अशा प्रकारे ग्रामपंचायत असलेल्या कुरुड या गडचिरोली जिल्ह्यातील गावांमध्ये एकाच रात्री सात नाटके , एक कव्वाली व बहारदार लावण्याचे विविध मोहल्यात आयोजन करण्यात आलेले आहे. झाडीपट्टीतील समृद्धता दर्शविणारे एकाच रात्री एकापेक्षा अनेक म्हणजेच विविध मोहल्यात नऊ नाटकाचे आयोजन करणारे देशातील हे एकमेव गाव असावे. झाडीपट्टीतील नाट्य रसिकता व नाटक विषयक सांस्कृतिक अस्मितेचे दर्शन घडविणारे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here