कोल्हापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्ते मौजे पैजारवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे शिक्षण महर्षी पांडुरंग हिरवे गुरुजी व शिक्षणव्रती भार्गव देशपांडे गुरुजी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या सर्वांच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान असणाऱ्या आपल्या शिक्षकांचा समाजाला नेहमीच विसर पडतो, पण पैजारवाडी गावाने त्यांचा विसर पडू न देता येथे शिक्षण रुजवत समाज घडविणाऱ्या दोन महान शिक्षकांचे स्मारक उभे केले, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी समस्त ग्रामस्थांचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. शिक्षण हे व्यक्तीला भविष्य घडवण्यात मदत करत असते. एक शिक्षक संपूर्ण समाज बदलू शकतो. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे शिक्षण महर्षी पांडुरंग हिरवे गुरुजी असल्याचे, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या भागातील मुलामुलींच्या शिक्षणाकरिता त्यांनी 165 शाळा सुरु केल्या व यात त्यांना त्यांचे मित्र शिक्षणव्रती भार्गव देशपांडे गुरुजी यांनी खंबीर साथ दिली. या दोन महान शिक्षकांच्या कार्यामुळे आज आपल्याला अनेक पिढ्या उच्च शिक्षित झाल्याचे पाहायला मिळत असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खा. धनंजय महाडिक, खा. धैर्यशील माने, आ. गोपीचंद पडळकर, आ. डॉ.विनय कोरे, आ. अमल महाडिक, आ. राहुल आवाडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

