ठाणे ग्रामीण भागातील लोकांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्प – मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे
मोजीस परमार विशेष जिल्हा प्रतिनिधी ठाणे – दि. १८ ठाणे जिल्हा परिषदेचा २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प आज मंगळवार, दि. १८ मार्च, २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, बी. जे. हायस्कूल येथील सभागृहात सादर करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थसंकल्पाची प्रत यावेळी प्रदान केली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन घुगे यांनी जिल्हा परिषदेचा १०८. ९३ कोटीं रुपयाचा अर्थसंकल्प सादर करताना लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक अर्थसंकल्प आहे असे प्रतिपादन केले.
जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प लोकाभिमुख असल्याचे सांगताना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, समाज कल्याण विभाग अंतर्गत दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करून जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची माहिती, कुटुंब प्रमुख, आर्थिक स्थिती तसेच आवश्यकता लक्षात घेऊन २६ योजना तयार करण्यात आला आहेत. तसेच ग्रामपंचायत विभाग अंतर्गत घरपोच सोईसुविधा पोहोचवण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र तसेच ऑनलाईन शासकीय दाखले देण्यासाठी अपमार्फत कामकाज करण्यात येणार आहे.
कृषी विभाग व पशूसंवर्धन विभाग अंतर्गत शेतकरी व पशुपालकांचे उत्पन्न वाढीसाठी प्रत्यक्षरीत्या काम करण्यात येणार आहे. शासकीय कामकाजातील अडथळा कमी करण्यासाठी तसेच नियोजनबद्ध काम करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागांतर्गत वेब पोर्टल तयार करण्यात येणार असून प्रत्येक कर्मचारी- अधिकाऱ्यांची ऑनलाईन माहिती पोर्टलवर उपलब्ध असेल. जेणेकरून मेडिकल बिल, पेन्शन, सेवार्थ लाभ देण्यासाठी सुलभ असेल.
रोगनिदान चाचण्या ई संजीवनी कार्यक्रम दिव्यांगाना सार्वजनिक इमारती सुगम्य करणे इत्यादी लोकाभिमुख कार्यक्रम राबविताना वैद्यकीय प्रतिकृती देयक, भविष्य निर्वाह निधी, मालमत्ता नोंदणी, कामवाटप इत्यादींची संगणकीय प्रणाली निर्माण करून पारदर्शक व गतिमान कार्य करण्याचे यावेळी आश्वासित केले आहे.
जिल्हा परिषदेचे स्व उत्पन्न वाढ करण्यासाठी मालमत्ता रजिस्ट्रेशन पोर्टल तयार करण्यात येणार आहे. सीएसआर फंड कोट्यवधी रुपये असून त्याचे नियोजन योग्यरीत्या करण्यासाठी सी. एस. आर. फंड साठी वेब पोर्टल तयार करून मदत करणाऱ्या सामाजिक संस्था यांना फंडची आवश्यकता लक्षात आणून देण्याचे काम या पोर्टल मार्फत करण्यात येईल तसेच आवश्यक त्या ठिकाणी सी. एस. आर फंड वापरण्याचे नियोजन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येईल.
ग्रामीण भागामध्ये शिक्षण, आरोग्य व महिला बालकल्याण या तीन विभागातील योजना योग्य पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. उत्पन्न वाढीसाठी जिल्हा परिषदेद्वारे योग्य गुंतवणूक व्यवस्थापन करण्यात आल्याने उत्पन्नामध्ये दहा कोटींची भरीव वाढ करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात आलेल्या दिशा कार्यक्रमाची दखल राज्य शासनाद्वारे घेण्यात आली असून दिशा कार्यक्रम राज्यस्तरावर राबवला जाणार आहे. तर ठाणे जिल्हा परिषदेची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे. शैक्षणिक गुणवत्ता तसेच भौतिक सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेचे देखभाल दुरुस्ती करण्याचे कामकाज देखील करण्यात येणार आहे.
तसेच जिल्हा परिषद निधीमध्ये स्वउत्पन्नासह राज्य, केंद्र शासन व इतर यंत्रणांकडून निधी प्राप्त होत असतो. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे स्व उत्पन्न अंतर्गत अर्थसंकल्प हा पूरक प्रकारचा असून सर्व विभागांना त्या अनुषंगाने निधी वाटप करण्यात आलेला आहे. या योजना राबवताना इव्हिडन्स बेस्ड पॉलिसी मेकिंग व क्लस्टर डेव्हलपमेंट या धोरणाचा समावेश करण्यात आलेला असून सन 2025- 26 चा अर्थसंकल्प त्यास दिशा देणारा आहे.
जिल्हा परिषद, ठाणे सन २०२५-२६ यावर्षीचा रक्कम रु १०८.९३ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये शिक्षण विभाग ९.६५ कोटी, इमारत व दळणवळण १९.८२ कोटी, कृषी ३.८३ कोटी ,पशुसंवर्धन ३.८७ कोटी, आरोग्य ३.८४ कोटी , ग्रामपंचायत मुद्रांक हिस्सा ३२.५० कोटी , लघु पाटबंधारे २.२१ कोटी आणि पाणीपुरवठा ३.६४ कोटी निधी एवढा मंजुर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी माहिती दिली आहे.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत / स्वच्छ भारत मिशन प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, कार्यकारी अभियंता बांधकाम/ पाणीपुरवठा संदिप चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहीतुले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास संजय बागुल, जिल्हा कृषी अधिकारी एम. एम. बाचोटीकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी दिलीप जोकार तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी-कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

