जातियतेच्या गडद अंधारात
कित्येक पिढ्या झाल्या नष्ट,
धर्माची विषारी चटके खाऊन
मूकपणे साहिले अनंत कष्ट. (१)
वस्तीवर मात्र व्यथा वेदनांचे ढग
नाही पोहोचला कधीच प्रकाश ,
होता श्वास गुदमरत चहुदिशांनी
जीवनात फक्त फाटलेलं आकाश. (२)
अख्ख्या हयातीत जगणं तमचरांचं
घेऊन हातात रोजचचं मरण,
पावलोपावली यातना दुःखाच्या
डोळ्यापुढे जीवनाचं रचलेलं सरण.(३)
उगवला भीमसूर्य पिडीत घरांवर
केली वस्तीच उजेडमय सारी,
मुक्त करून बंदिस्त पाखरांना
उधळली सुखाची किरणे दारोदारी. (४)
अरुणोदय जीवनात शोषितांच्या
न्हाऊन निघाली वंचितांची धरणी,
सारला साराच अंधार दूर दूर
ही फक्त माझ्या भिमाची करणी….
ही फक्त माझ्या भिमाची करणी…. (५)
रवि ताकसांडे
गडचांदुर जि. चंद्रपूर

