कोसारा येथे अभ्यासिकेच्या कामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन
भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर – आजच्या स्पर्धात्मक युगात गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सातत्यपूर्ण अभ्यास हेच विद्यार्थ्यांच्या यशाचे खरे शस्त्र आहेत. ग्रामीण तसेच नागरी भागातील होतकरू विद्यार्थ्यांना योग्य, शांत व सुविधा-संपन्न अभ्यासाचे वातावरण उपलब्ध व्हावे, यासाठी अभ्यासिकेची निर्मिती ही काळाची गरज ठरत असून कोसारा येथे तयार होणारी अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेच्या युगात यशाचा आधारस्तंभ ठरेल, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांनी खनिज विकास निधीतून मंजूर केलेल्या ५० लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या मराठा सेवा संघाच्या अभ्यासिकेच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आ. जोरगेवार त्यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, भाजप नेते नामदेव डाहुले, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर, मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक जेउरकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य, मराठा उद्योग कक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष कुचनकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, आज आपण या पवित्र भूमीवर अभ्यासिकेच्या भूमिपूजनासाठी एकत्र आलो आहोत. हा केवळ इमारतीच्या बांधकामाचा प्रारंभ नाही, तर आपल्या मुला-मुलींच्या भविष्यासाठी उभारण्यात येणाऱ्या आशेच्या नव्या किरणाचा प्रारंभ आहे. शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नसून, ते व्यक्तिमत्व घडवण्याचे, समाज बदलण्याचे आणि देश घडवण्याचे प्रभावी माध्यम आहे.
चंद्रपूरात अम्मा की पढाई हा उपक्रम सुरु करण्यात आला असून, या अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना निशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन दिले जात आहे. अनेक विद्यार्थ्यांना घरी अभ्यासासाठी आवश्यक शांत, एकाग्रतेचे वातावरण मिळत नाही. ही गरज लक्षात घेऊन मतदारसंघात अभ्यासिकांचे जाळे उभारण्याचा संकल्प आम्ही केला असल्याचे यावेळी ते म्हणाले. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
ॐ तुलसी नगर येथे राणी हिराई उद्यान सौंदर्यीकरणाच्या कामाचे उद्घाटन
आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते तुकूम परिसरातील तुलसी नगर येथे ५० लाख रुपये निधीतून करण्यात आलेल्या राणी हिराई उद्यानाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचे उद्घाटन नुकतेच पार पडले.या कार्यक्रमाला भाजपचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, माजी महापौर अनिल फुलझेले, भाजपचे माजी महानगर अध्यक्ष तुषार सोम, तुलसीनगर विकास समितीचे अध्यक्ष कृष्णा देवताळू, उपाध्यक्ष वासुदेव भोई, ज्येष्ठ नागरिक अविनाश राखुंडे, गणेश महल्ले, उमा पाल, शालू सोनेकर, मनीषा कन्नमवार, नंदा बिहाडे, वर्षा झाडे, शालिनी सुरवडे, माला रामटेके आदींची उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, तुलसी नगर परिसरात लोकवस्ती वाढत असून काही ठिकाणी असुरक्षिततेची भावना होती. पावसाळा व रात्रीच्या वेळी धोके जाणवत होते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आणि सौंदर्यवृद्धीसाठी हे काम पूर्ण करण्यात आले आहे. आता या उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी अधिक सुरक्षित वातावरण उपलब्ध होणार आहे. येथील सौंदर्यीकरणामुळे परिसर स्वच्छ, आकर्षक झाला असून, भविष्यात या भागात आणखी विकासकामे करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

