राज्यात नगरपालिका क्षेत्रातील पहिले मॉडेल सिनेमा थिएटर गडचिरोलीत सुरू
गडचिरोली, दि. २२ : राज्यातील नगरपालिका क्षेत्रात पहिल्यांदाच गडचिरोली शहरात वातानुकूलित मोबाईल सिनेमा थिएटर सुरू करण्यात आले असून, याचा उद्घाटन समारंभ आज जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या उद्घाटन प्रसंगी नगरपरिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, प्रशांत वाघरे, योगीता पीपरे, प्रमोद पीपरे, सूरजीत रॉय, अनिल कुनघाडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी यावेळी सांगितले की, “गडचिरोली शहरासाठी हा मनोरंजन क्षेत्रातील एक ऐतिहासिक क्षण आहे. जिल्हा नियोजन विकास निधीतून या सिनेमा गृहासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून नगर परिषदेच्या माध्यमातून हे सिनेमागृह उभारण्यात आले आहे.” या सिनेमागृहात पुढील टप्प्यात किड्स झोन, फूड कोर्ट आणि विविध सुविधा सुरू करण्यात येणार असून, या सिनेमा गृहाला मॉडेल सिनेमा थिएटर म्हणून विकसित केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल, दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार मनोरंजनाची सोय उपलब्ध होणार असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात आणखी एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “हे सिनेमा थिएटर गडचिरोलीच्या सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्रात मानाचा तुरा ठरेल. येथे केवळ करमणूकप्रधानच नव्हे, तर सामाजिक प्रबोधन करणारे चित्रपटही दाखवण्यात येणार आहेत, जे समाजाला सकारात्मक संदेश देतील.”
मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी हे सिनेमा गृह अल्पावधीत उभे राहण्यासाठी जिल्हाधिकारी श्री पंडा व आमदार डॉ. नरोटे यांचे सहकार्य मोलाचे ठरल्याचे नमूद केले. त्यांनी येत्या काळात इतर पूरक सुविधा लवकरच उभारण्यात येतील असेही सांगितले.
हे सिनेमा थिएटर विशेष प्रकारच्या हवेने फुगवलेल्या तंबूमध्ये तयार करण्यात आले असून, त्यात वातानुकूलनाची सुविधा आहे. यामध्ये एकूण १२० प्रेक्षक बसण्याची व्यवस्था असून, दररोज चार शो दाखविण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाचे संचालन आनंद खुने यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गणेश ठाकरे यांनी मानले.

