तुरुंगातील महिला कैद्यांना स्वावलंबी बनवण्याचा स्तुत्य उपक्रम

0
41

चंद्रपूर, दि. 22 मे : कारागृह हे केवळ शिक्षा भोगण्याचे ठिकाण राहिलेले नसून, आता ते महिला कैद्यांच्या पुनर्वसनाचे केंद्र बनले आहे. श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था, बल्लारपूर यांनी चंद्रपूर जिल्हा कारागृहातील महिला कैद्यांसाठी मेहंदी, ब्युटी पार्लर, शिवणकाम आणि भरतकामाचे प्रशिक्षण सुरू केले आहे. या उपक्रमामुळे महिला कैद्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, त्यांचे जीवन उजळण्यास मदत मिळत आहे.
या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन तुरुंग अधीक्षक अनुप कुमार कुमारे यांच्या हस्ते झाले. या वेळी पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार, वरिष्ठ तुरुंगाधिकारी नागेश कांबळे, कारागृह शिक्षक संजीव हातवडे, तसेच प्रशिक्षिका कविता डेरकर आणि रीना पोर्टेट उपस्थित होत्या.
श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था हे केवळ चंद्रपूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील तुरुंगांमध्ये कैद्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे महिला कैद्यांना सुटकेनंतर नवजीवन सुरू करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळते.
महिला कैद्यांनीही या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “या प्रशिक्षणामुळे आमच्या अंधाऱ्या जीवनात आशेचा किरण निर्माण झाला आहे. सुटकेनंतर आम्ही हे कौशल्य वापरून आमच्या कुटुंबाचा आधार बनू, तसेच समाजातील इतर महिलांनाही स्वावलंबी बनवण्यासाठी प्रेरणा देऊ.”
या कार्यक्रमाला महिला कैदी, तुरुंग कर्मचारी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here