पर्यावरणाला हानी पाहुचवणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा : शिवसैनिक सुरज शाहा
स्वाती मेश्राम जिल्हा उपसंपादक चंद्रपूर – नगर परिषद भद्रावती हद्दीतील काही भागांमध्ये MSEB भद्रावती (महावितरण) द्वारे झाडांच्या फांद्या छाटण्याच्या नावाखाली झाडांची कत्तल केल्याचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकारामुळे परिसरातील पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन शिवसेना भद्रावतीच्या वतीने नितीन मत्ते यांच्या मार्गदर्शनात व शिवसैनिक सुरज शहा यांच्या नेतृत्वात नगर परिषद भद्रावती, वनविभाग भद्रावती व तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात झाडांच्या छाटणीसाठी लागणाऱ्या अधिकृत परवानग्यांची तपासणी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नगर परिषद भद्रावती यांनी यासंदर्भात स्पष्ट केले की, महावितरण (MSEB) कडून फक्त झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी पत्र प्राप्त झाले होते. मात्र, झाडे कापण्याची कोणतीही अधिकृत परवानगी दिलेली नाही.
असेच स्पष्टीकरण वनविभाग भद्रावती व तहसील कार्यालय भद्रावती यांच्याकडून देखील देण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मागणी केली आहे की, दोषी अधिकाऱ्यांवर आणि झाडांची अनधिकृत कत्तल करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी व भविष्यात अशा प्रकारास आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्यात याव्यात. यावेळी शिवसैनिक सुरज शाहा, उपतालुकाप्रमुख सिंगलदीप पेंदाम, शिवसैनिक सुमित हस्तक, शिवसैनिक दीप गारघाटे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

